आयडॉलमधील नियुक्त्या संपलेल्या, वेतन थकलेल्या प्राध्यापकावरच परीक्षांचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 06:30 PM2020-10-08T18:30:04+5:302020-10-08T18:30:36+5:30
Online Examinations : आयडॉलच्या परीक्षा गोंधळाचे खापर प्रशासनाकडून प्राध्यापकांवर
प्राध्यापक संघटनेकडून संताप व्यक्त , आधी पुनर्नियुक्त्यांची मागणी
मुंबई : आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षाचे सुरळीत नियोजन करण्यात मुंबईविद्यापीठ व नेमलेली खाजगी एजन्सी अपयशी ठरले. मात्र या अपयशाचे खापर आयडॉलमधील शिक्षकांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनकडून प्रयत्न केला जात सल्याचे समोर येत आहे. दरम्यान ज्या प्राध्यापकांच्या डोक्यावर प्रशासन हे खापर फोडू पाहत आहे, त्यातील अनेक प्राध्यापकांच्या नियुक्त्याच संपल्या आहेत तर अनेकांचे वेतन मागील ४ महिन्यापासून प्रलंबित असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या प्राध्यापकांच्या नियुक्त्या नियमित करणे दूर मात्र अंतिम वर्ष परीक्षांसाठी विना वेतन काम करणाऱ्या प्राध्यापकांशी कुलगुरू व अधिकाऱ्यांनी सन्मानाने वागण्याची अपेक्षा संतप्त प्राध्यापक वर्गातून होत आहे,
आयडॉल तसेचविद्यापीठ विभागातील तात्पुरत्या आणि कंत्राटी तत्त्वावरील प्राध्याकांचा विषय या पूर्वीच सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी व्यवस्थापकीय बैठकीत उपस्थित केला होता मात्र केवळ आश्वासन देऊन विद्यापीठ प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान आयडॉलची मान्यता रद्द होत असताना याच तात्पुरत्या आणि कंत्राटी प्राध्यापकांच्या सहाय्याने आयडॉलला मान्यतेची मुदतवाढ मिळाली असल्याचे बहुतेक विद्यापीठ प्रशासन विसरले असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र आयडॉलमधील तांत्रिक बिघाडाच्या गोंधळानंतर कुलगुरुसोबत झालेल्या बैठकीत ज्या प्राध्यापकांनी प्रश्नसंच तयार केले , ते खाजगी पुरवठादार एजन्सीला पुरविले, विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम केले त्याच प्राध्यापकांचीच कान उघडणी केली व त्यांचे मनोधैर्य खच्ची केले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पुनर्नियुक्त्या नसताना,वेतन प्रलंबित असताना प्राध्यापक त्या ठिकाणी काम करीत असून त्यांचे मनोबल वाढविण्याऐवजी त्यांचा अपमान केला जात असल्याचा निषेध मुक्ता संघटनेने केला असल्याची माहिती महासचिव सुभाष आठवले यांनी दिली.
या सगळ्या प्रकारानंतर ज्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या संपल्या आहेत त्या पुन्हा कराव्यात, थकीत वेतन अदा करावे आणि प्राध्यापकांना सन्मानाची वागणूक अधिकाऱ्यांनी द्यावी अशी मागणी मुक्ता संघटनेकडून करण्यात आली आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या संपलेल्या असतान अकॅडेमीक हेड म्हणविणार्या ज्या अधिकार्याना पुनर्नियुक्त्याकरण्यास वेळ मिळाला नाही. त्या अधिकार्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सुभाष आठवले यांनी केली आहे.