मुंबई : मुंबईतील खड्ड्यांवर परदेशी मात्रा लागू पडत आहे. मात्र हे तंत्रज्ञान खर्चीक असल्याने महापालिका स्वदेशातच हा माल तयार करण्याचा प्रयोग करणार आहे. यासाठी नेमलेला सल्लागार या परदेशी मालाची चाचणी घेऊन तसेच तंत्र मुंबईतच तयार करून देणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचा आजार बळावतो. यावर अनेक देशी-परदेशी प्रयोग आतापर्यंत फेल गेले आहेत. मात्र इस्रायल आणि आॅस्ट्रियातून आलेले नवीन तंत्रज्ञान मुंबईच्या रस्त्यांसाठी मलम ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी माल वापरूनच पावसाळ्यात खड्ड्यात गेलेलेरस्ते पूर्ववत करण्यात येतआहेत.मात्र खड्डे भरण्याचे हे तंत्र खूप खर्चीक असल्याने पालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढत आहे.मुंबईतच खड्ड्यांवरचा हा जालीम उपाय तयार होऊ शकतो का? याची चाचपणी सुरू आहे. यासाठी पालिकेने इच्छुक कंपन्यांना पुढे येण्याचे आवाहन केले असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. दरम्यान, पावसाळ्यात थांबलेली रस्त्यांची कामे आॅक्टोबरच्या १ तारखेपासून पुन्हा सुरू होत आहेत. असे १०३२ रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत.१ आॅक्टोबरपासून १०३२ रस्त्यांची दुरुस्ती पुन्हा एकदा वेग घेणार आहे. यामध्ये पावसाळ्यापूर्वी बंद करण्यात आलेल्या ७१३ रस्त्यांचा समावेश आहे.या रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. ७१३ रस्त्यांमध्ये ३०६ मुख्य रस्ते, २४८ छोटे आणि १५९ रस्त्यांच्या बाजूच्या पट्ट्या यांचा समावेश आहे.उर्वरित ३१९ रस्त्यांच्या कामांसाठी सप्टेंबर महिन्यात निविदा मागविण्यात येणार आहेत. यामध्ये ९५ मुख्य रस्ते, १९१ छोटे रस्ते आणि ३३ रस्त्यांच्या बाजूच्या पट्ट्यांचा समावेश आहे.या रस्त्यांची यादी पालिकेने संकेतस्थळावरून जाहीर केली आहे. त्यामुळे कोणते रस्ते दुरुस्त केले आहेत, याची माहिती सर्वसामान्य मुंबईकरांनाही कळू शकेल.दरवर्षी सुमारे आठ हजार खड्डे बुजविण्याचे काम पालिकेला करावे लागते.
परदेशी मुलाम्याचा तिजोरीला भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:18 AM