मुंबई : दिवाळीच्या हंगामात जादा उत्पन्न मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली आहे. याचा भार प्रवाशांच्या खिशावर पडत आहे. ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ही भाडेवाढ सुरू झाली आहे. २७ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजतापर्यंत हा टक्के वाढीव दराने प्रवाशांना तिकीट काढावे लागणार आहे.
राज्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होतो. त्यामुळे या काळात नागरिक मूळ गावी, नातेवाइकांकडे जातात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढते. त्याचा गैरफायदा ट्रॅव्हल्स कंपन्या घेतात. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागातर्फे ९ ते २० नोव्हेंबरदरम्यान नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त दररोज १२ जादा फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१०टक्के भाडेवाढ एसटीने केली
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवास भाड्यात १० टक्के दरवाढ केली आहे. मुंबईहून सावंतवाडी येथे जायचे झाल्यास ८२५ रुपयांचे तिकीट काढून प्रवास करावा लागेल. सर्वच प्रकारच्या बसकरिता ही भाडेवाढ असणार आहे. यामध्ये शिवशाही, साधी, जलद, निमआराम या बसचा समावेश आहे. भाडेवाढ झाल्यामुळे नागरिकांना नेहमीपेक्षा जादा पैसे तिकिटासाठी द्यावे लागणार आहेत.
या मार्गांसाठी विशेष नियोजन
मुंबईतून १५० बस सोडल्या जाणार आहेत. राज्यभरात लांब पल्ल्यांसाठी एसटी महामंडळाने नियोजन केले आहे. दिवाळीत मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. त्याचा फायदा घेत ट्रॅव्हल्स कंपन्या अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे आकारून प्रवाशांची लूट करतात. एसटीने मुंबई - औरंगाबाद, मुंबई - सातारा, मुंबई - पुणे, मुंबई - कोल्हापूर आणि इतरही मार्गांसाठी नियोजन केले आहे. नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त दररोज १२ जादा फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाडेवाढ केली, पण सुविधा मिळाव्यात. एसटी महामंडळाकडे आधीच एसटी बसेसचा तुटवडा आहे. महामंडळाने प्रवास भाड्यामध्ये हंगामी दरवाढ करताना सुखकर प्रवासासाठीही उपाययोजना करायला हव्यात. - सुधीर शिर्के, प्रवासी
दिवाळीच्या हंगामात गर्दी वाढणार असल्याने एसटीच्या फेऱ्या आणखी वाढविल्या पाहिजेत. आता वाढविलेल्या फेऱ्या गर्दीच्या तुलनेत कमी आहेत. - प्रशांत चेमटे, प्रवासी