कांदिवलीत सात दुकानांत घरफोडी
By admin | Published: March 19, 2016 01:21 AM2016-03-19T01:21:24+5:302016-03-19T01:21:24+5:30
कांदिवलीमध्ये सात दुकानांत घरफोडी करणाऱ्या तीन सराईत चोरांना गुरुवारी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मुंबई : कांदिवलीमध्ये सात दुकानांत घरफोडी करणाऱ्या तीन सराईत चोरांना गुरुवारी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या अटकेमुळे अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
हरून जैदुर सरदार (३०), अरफान रकमत मुल्ला (२६) आणि जुबेर दाऊद मेमन (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत.ते मालवणीचे राहणारे आहेत. कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास कांदिवली पश्चिमच्या रामजी लुलला इंडस्ट्रीयल इस्टेटमधील सोने-चांदीची सात दुकाने फोडली. आरोपींनी आठ किलो चांदी लंपास करून पळ काढला होता.या दुकानातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी या तिघांची माहिती मिळविली. हे तिघे कांदिवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली आणि त्यांना अटक केल्याचे पवार यांनी सांगितले. हरुन हा तडीपार असूनही या परिसरातील दागिन्यांच्या दुकानांना त्याने टार्गेट केले. या तिघांनी अनेक ठिकाणी अशाचप्रकारे घरफोड्या केल्याची शक्यता आहे.