गौरी टेंबकर मुंबई: पत्नीवर पेट्रोल ओतत तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अजय राजीव परमार (२५) नामक तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. त्याची पत्नी गुड्डी परमार (२३) ही स्टोव्हच्या भडक्यात भाजल्याचा बनाव त्याने केला होता. तसेच तिला वाचवतान त्याचे हात भाजल्याचेही त्याने सांगितले. मात्र तपासात खरी बाब उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जोगेश्वरी पूर्वच्या साईधाम वाडीमध्ये राहणाऱ्या गुड्डीला भाजलेल्या अवस्थेत मंगळवारी कूपर रुग्णालयात आणले होते. तिने सुरुवातीला पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, ती घरी जेवण बनवत होती. तिथे स्टोव्हचा स्फोट होऊन भडका उडाला ज्यात ती भाजली. परंतु, पोलिसांनी अपघातस्थळी भेट दिली तेव्हा त्यांना तिथे कोणताही स्टोव्ह आढळला नाही तेव्हा त्यांच्या पासून काहीतरी लपवले जात असल्याचा त्यांना संशय आला.
तहसीलदारांच्या विनंतीनंतर गुड्डीचे बयाण नायब तहसीलदार तसेच कार्यकारी दंडाधिकारी अशोक सानप यांनी रुग्णालयात नोंदवले. ज्यामध्ये तिने तिच्या पतीने तिला मारण्याचा प्रयत्न कसा केला हे सांगितल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. तिने निवेदनात म्हटले आहे की, तिचा नवरा मद्यपी आहे आणि तो तिला अनेकदा घरगुती कारणावरून मारहाण करत असे. अखेर या विरोधात ती त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यासाठी जाताना त्याने तिला पेटवून दिले असे दुसर्या अधिकाऱ्याने सांगितले. तिला मारण्यासाठी त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिल्याचेही त्यांनी नमूद केले.