जळक्या लाकडांचा ‘होल्टे होम’
By admin | Published: March 11, 2017 08:15 PM2017-03-11T20:15:18+5:302017-03-11T20:29:05+5:30
सावर्डेत साजरा होणार शिमगोत्सव आगळावेगळा असाच आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डेत साजरा होणार शिमगोत्सव आगळावेगळा असाच आहे. शिमगोत्सवाच्या नवव्या रात्री गावातील सर्व गावकर, खुमदार, खोत, गुरव व पाहुणे मंडळी एकत्र येत देवाच्या सामुहिक जागेमध्ये होल्टेहोमचा खेळ खेळतात. असा खेळ अवघ्या महाराष्ट्रात कुठेही खेळला जात नाही. या खेळाचे विशेष म्हणजे जळकी लाकडे (होल्टे) एकमेकांच्या अंगावर देवाच्या नावाने फाका मारत फेकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची इजा गावकऱ्यांना होत नाही. हा खेळ ज्याला खेळायचा आहे, त्याने यासाठी सकाळपासून उपवास धरणे आवश्यक असते. त्यानंतर रात्री सर्वजण एकत्र आल्यावर मैदानाच्या एका बाजूला गावातील मानकरी तर दुसऱ्या बाजूला गावातील खोत मंडळी उभी राहुन आपापल्या वाडीतील सतत नऊ दिवस पेटवलेली होळीची जळकी लाकडे एकत्रित करुन ती पेटवून हे जळके होल्टे घेऊन मैदानात खेळ खेळण्यासाठी येतात.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातील गावकर, गुरव, खुमदार, खोतमंडळी गावच्या देवळात एकत्र येऊन नऊ दिवस होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा ठरवतात. त्यानंतर पहिल्या दिवशी ग्राममंदिरात एकत्र येत ग्रामदेवतेला श्रीफळ अर्पण करत उत्सवाची सुरुवात करतात. यावेळी प्रथम मंदिराच्या आवारातून बाहेर पडल्यावर ढोल-ताशे, पिपाणी व अन्य वाजत्रींच्या साथीने ग्रामदैवतेच्या होळीच्या नावाने फाका (बोंबा) मारत मानकऱ्यांच्या घरी जातात. त्यानंतर मानकरींना घेऊन देवाच्या रुपांचे पूजन करतात. प्रत्येक वाडीनुसार नऊ दिवसांच्या पूजेसाठी शेवरीचे झाड शोधतात. ते झाड शोधून ते तोडून आणत आपापल्या वाडीमध्ये सामूहिक जागेमध्ये खड्डा खोदून त्यात रोवले जाते. त्यानंतर त्याची पूजा करून संध्याकाळी एकत्र येत ती शेवर दरदिवशी वरंड आणि पेंड्याच्या सहाय्याने पेटवली जाते. दहाव्या दिवशी ग्रामस्थ एकत्र येऊन सरळ रेषेत उंच असलेले ऐनाचे झाड शोधतात. त्याला पारंपरिक भाषेत ‘मांड’ म्हटले जाते. सर्व ग्रामस्थ अगदी आबालवृध्दही माडाजवळ जमतात. त्यानंतर मांडाची सुहासिनींच्याहस्ते पूजा केली जाते. हा मांड ग्रामदैवतेच्या सहाणेवरती आणून तिथे खड्डा खणून रोवले जाते. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी गोडासण तसेच तीखट सणही साजरा केला जातो. पंचागातील अग्नीहोमच्या वेळेनुसार सहाणेवरती अग्नीहोम केला जातो. गावातील सर्व नवोदित जोडपी त्या पेटलेल्या अग्नीहोमाभोवती गोल फेऱ्या मारून त्या होमामध्ये नारळ टाकले जातात. त्यानंतर देवीची ओटी भरली जाते. तर सायंकाळी सहाणेवरती सर्व गावकरी एकत्रित आल्यानंतर मोठी यात्रा भरते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामदैवतेची पालखी प्रत्येकाच्या घरी नेली जाते.
रवींद्र कोकाटे, सावर्डे