Join us  

दिवाळीत फटाके फोडा दोनच तास, रात्री ८ ते १० दरम्यानच परवानगी, हायकोर्टाचा सुधारित आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 6:12 AM

मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली.

मुंबई : मुंबई आणि लगतच्या परिसरात वायूप्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेत उच्च न्यायालयाने ६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आपल्या आदेशात शुक्रवारी सुधारणा करत फटाके फोडण्याची वेळ तीन तासांवरून कमी करत दोन तासांवर आणली. त्यामुळे रात्री ७ ते १० ऐवजी आता रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत. 

मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यापाठोपाठ न्यायालयानेही यासंदर्भात स्वयंप्ररणेने याचिका दाखल करून घेतली. त्यावरील सुनावणी करताना मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुंबईत फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे म्हटले. ‘दिल्लीकर बनू नका, मुंबईकरच राहूया,’ असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय म्हणाले. फटाक्यांच्या उत्पादन पातळीवरच काही तपास करू शकतो का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. 

शहरात अशी काही ठिकाणे आहेत की, तेथील हवेची गुणवत्ता अद्यापही खराब आहे. आपण एका आपत्कालीन आणि गंभीर परिस्थितीत आहोत. बरेच प्रयत्न केले जात आहेत. परंतु, आणखी बरेच काही करावे लागेल. त्यामुळे आम्ही ६ नोव्हेंबरच्या आदेशात सुधारणा करत आहोत.     - उच्च न्यायालय

टॅग्स :दिवाळी 2023उच्च न्यायालय