कशेडी घाटात बस कोसळली दरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:06 AM2021-01-01T04:06:07+5:302021-01-01T04:06:07+5:30
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात विरार-मुंबई ते कणकवली जाणारी खासगी लक्झरी बस सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. ...
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात विरार-मुंबई ते कणकवली जाणारी खासगी लक्झरी बस सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भोगावच्या हद्दीत घडला. या अपघातात एक जण ठार, तर १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
विरार-मुंबई येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स ही खाजगी लक्झरी बस २७ प्रवासी, २ चालक, १ क्लीनर अशा एकूण ३० जणांना घेऊन कशेडी घाटातून कणकवली दिशेने जात असताना कशेडी घाटात भोगावच्या हद्दीत खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात आठ वर्षांचा साई राजेंद्र राणे (राहणार तरळे, सिंधुदुर्ग) हा जागीच ठार झाला. तर, वासुदेव शेलार हे ७० वर्षांचे वयोवृद्ध एक तासापेक्षा जास्त वेळ गाडीत अडकून होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व पोलिसांना यश आले.
या अपघाताची माहिती कशेडी पोलिसांना समजताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका व महाड येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रोपच्या साह्याने जखमींना बाहेर काढून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलादपूर तहसीलदारांना समजताच तहसीलदार दीप्ती देसाई, नायब तहसीलदार समीर देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
जखमींची नावे :
या अपघातात राकेश भालेकर (३२, रा. उमरखेड, चिपळूण), गंगाराम पडवळ (६, रा. चेंबूर, संगमेश्वर), सुमित्रा गंगाराम पडवळ (६०, रा. संगमेश्वर), चंद्रप्रिया विठ्ठल शिगवण (६७, राहणार हत्तीगाव संगमेश्वर), प्रणीत चंद्रकांत चव्हाण (३२, राहणार जोगेश्वरी मुंबई), राजेंद्र कृष्णा राऊळ (३६, राहणार कणकवली), कृष्णा वासुदेव राऊळ (७०, रा. कणकवली), वनिता विजय प्रभू (५६, रा. तळे सिंधुदुर्ग), रिया करमाळकर (२९, रा. केळवली राजापूर), सलोनी सदानंद कावळे (१४, रा. मुंबई), आशा अशोक लोणकर (३२, रा. राजापूर), विठ्ठल शिवराम शिगवण (७७, रा. गोवंडी मुंबई), प्रमोद विठ्ठल मोहिते (४५, रा. गोवंडी मुंबई), संतोष विठ्ठल मोहिते (४८, रा. गोवंडी मुंबई), यज्ञा राजेंद्र करमाळकर (१ वर्ष), वासुदेव तुकाराम शेलार (७०, रा. करमाळकरवाडी कणकवली) असे एकूण १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.