चाकरमान्यांना मिळणार दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने मुंबईतील सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. बेस्ट उपक्रमाने बस मर्गांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार १५ नवे मार्ग सुरू करीत लांब पल्ल्यांचे २२ बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी बुधवारपासून नवीन बस मार्ग सुरू करण्यात आले. ही बससेवा गर्दीच्या वेेेळेत दर १५ मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून मुंबईत लॉकडाऊन लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाने दिलासा दिला. या काळात लाखभर कर्मचारीच बसगाड्यांनी प्रवास करीत होते. जून २०२०मध्ये ''मिशन बिगीन अगेन'' सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या अडीच लाखांवर पोहोचली. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होऊ लागली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बेस्टची प्रवासी संख्याही २५ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या दीड वर्षात बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात मोठी घट झाली. मात्र, आता प्रवासी संख्या पुन्हा वाढत असल्याने बसफेऱ्या वाढवण्याकरिता बेस्ट उपक्रमाने नियोजन केले आहे. तसेच इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित बसगाड्यांची वाढ करण्यात येत आहे.
प्रवासी संख्या २५ लाखांवर...
जून महिन्यात १८ लाख प्रवासी दररोज बस गाड्यांमधून प्रवास करीत होते. मागील दोन महिन्यांत साडेसहा लाख प्रवासी वाढले आहेत.
इलेक्ट्रिक बसगाड्यांचा ताफा....
पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. त्यानुसार डिसेंबर २०२२पर्यंत मुंबईत दोन हजार इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. तसेच गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या बस सेवांमध्येही वाढ करण्यात येणार आहे.