कामोठे : स्थानिक रिक्षावाल्यांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकावरील प्रस्तावित असलेली अंतर्गत बससेवा अखेर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरु करण्यात आली. यामुळे कामोठे वसाहतीतील रहिवाशांना अत्यल्प दरात रेल्वेस्थानक गाठता येऊ लागले आहे. याकरिता एनएमएमटी, सिडको आणि पोलिसांनी अतिशय सकारात्मकरीत्या पुढाकार घेऊन ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये सातत्य राहणार असून कोणी अडथळा आणल्यास त्यांच्यावर पोलीस उपाय करणार आहेत. तसा जाहीर इशारा कामोठे पोलिसांनी दिला. त्यामुळे या सेवेत सातत्य राहील असा विश्वास व्यक्त होत आहे.कामोठे वसाहतीलगत खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानक असल्याने येथून काही मिनिटांत उपनगरीय रेल्वे गाड्या पकडता येतात. त्यामुळे अनेक चाकरमानी, व्यावसायिक त्याचबरोबर मोठमोठ्या कंपन्यात उच्चपदावर काम करणारे उच्चपदस्थ या नोडमध्ये राहतात. एकूण ४५ सेक्टरमध्ये विस्तारलेल्या या वसाहतीतील लोकसंख्या वाढत आहे. जवळपास अडीच लाखांच्यापेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या या वसाहतीत अंतर्गत वाहतुकीकरिता रिक्षाशिवाय कोणतीच व्यवस्था नव्हती. रेल्वेस्थानक त्याचबरोबर इतर ठिकाणी जाण्याकरिता तीनआसनी रिक्षांचा वापर करावा लागत होता.या ठिकाणी कामोठे गावातील रिक्षावालेच धंदा करीत असून इतरांना ते नाक्यावर उभे राहून देत नाहीत. रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकावरुन कामोठे वसाहतीत जाण्याकरिता रिक्षा कमी पडतात तरी सुध्दा इतर रिक्षावाल्यांना या ठिकाणी व्यवसाय करु दिला जात नव्हता. सायंकाळी शेअर रिक्षात बसण्याकरिता रांग लावावी लागत असे. त्याचबरोबर एका रिक्षात पाच ते सहा जणांना बसवून त्यांचा जीव धोक्यात घातला जात असे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्याचबरोबर त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी बससेवा सुरु करावी अशी मागणी जोर धरु लागली होती. या मागणीची दखल घेत एनएमएमटीने बससेवा सुरु केली आहे. या निर्णयाचे कामोठेकरांनी स्वागत केले असून त्यामध्ये सातत्य असावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी नवी मुंबई परिवहन समितीचे सभापती गणेश म्हात्रे, परिवहन अधिकारी प्रशांत म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.रेल्वेस्थानक ते कामोठे वसाहत पाच रुपयांतमानसरोवर ते खांदेश्वर रेल्वेस्थानक या मार्गावर ५७ क्रमांकाची बस सकाळी आणि सायंकाळी दर ९ मिनिटांनी चार गाड्या धावणार आहेत. खांदेश्वर रेल्वेस्थानकावरुन सुटणार बस विस्टा कॉर्नर, स्मशानभूमी, सेक्टर-१५, बँक आॅफ महाराष्ट्र, जीवन विद्या केंद्र, रयत शिक्षण संस्था, जैन पार्क, कामोठे पोलीस ठाणे, शिवाजी महाराज चौक, पटेल प्लाझा मार्गे मानसरोवर रेल्वे स्थानकाकडे जाते. आवाज अपार्टमेंटकरिता पाच रुपये, जैन पार्कला जाणाऱ्या प्रवाशांना सात आणि शेवटचा थांब्याकरिता ९ रुपये मोजावे लागत आहेत. हे दर रिक्षापेक्षा कमी असल्याचे प्रवाशांनी सांगितले.सकाळी ६.१५ वाजता पहिली गाडीसकाळी सव्वा सहा वाजता दोनही रेल्वेस्थानकावरुन पहिली बस सुटणार असून सायंकाळी ९.१७ वाजता शेवटची गाडी असणार असल्याचे एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी आणि सायंकाळी जास्त गर्दी असल्याने कामोठेकरांना आता पायपीट करावी लागणार नसल्याचे चित्र आहे.बसला पोलीस बंदोबस्तच्मानसरोवर आणि खांदेश्वर या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करुन बस टर्मिनल्स उभारण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी बसला स्थानिक रिक्षावाल्यांनी विरोध दर्शविल्याने सेवा सुरु करण्यात आली नव्हती. च्काही वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर एमएमएमटी बससेवा सुरु करण्यात आली होती. मात्र त्यावर रिक्षाचालकांनी दगडफेक करुन नुकसान केले. त्यामुळे एनएमएमटीने ही सेवा बंद करण्यात आली. मात्र वाढत्या मागणीचा विचार करुन सिडकोने एनएमएमटीकडे मानसरोवर ते खांदेश्वर या ठिकाणी बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव दिला. च्त्यानुसार एनएमएमटीने पोलिसांकडे बंदोबस्तांची मागणी केली. अतिशय चांगला उपक्रम असल्याने पोलीस उपायुक्त संजयसिंग येनपुरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी पुढाकार घेतला आणि आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पोलीस बंदोबस्तात एनएमएमटी बससेवा सुरु केली.