धावती बस पेटली
By admin | Published: December 15, 2015 01:50 AM2015-12-15T01:50:08+5:302015-12-15T01:50:08+5:30
बोरीवलीवरून ठाण्याकडे येणाऱ्या एसटीच्या सेमी लक्झरी बसला घोडबंदर रोडवरील कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर अचानक आग लागली, परंतु चालकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे
ठाणे : बोरीवलीवरून ठाण्याकडे येणाऱ्या एसटीच्या सेमी लक्झरी बसला घोडबंदर रोडवरील कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर अचानक आग लागली, परंतु चालकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे बसमधील १९ प्रवाशांचे प्राण वाचले. ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सकाळी १० च्या सुमारास ही बस ठाण्याहून बोरीवलीला गेली होती. त्यानंतर १२.३० च्या सुमारास पुन्हा ती परतीच्या प्रवासात घोडबंदरला कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर आली असता, इंजिन मधून धूर येत असल्याचे चालक शिवाजी डोंगरेंच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस घेऊन १८ प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर बसमधील आग विझविण्याच्या बाटल्याने ती विझविण्याचादेखील प्रयत्न केला, परंतु आगीने अधिक भडका घेतला. सुदैवाने चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर तिने पेट घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दल आणि महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले, परंतु तोपर्यंत ती जळून खाक झाली होती. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.
टेम्पोला अचानक आग
दुसऱ्या घटनेत सव्वाएकच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशेने एसीचे कॉम्प्रेसर घेऊन निघालेल्या टॅम्पोला तीनहात नाक्यावरील ब्रिजजवळ अचानक आग लागली. त्याच्या मागील बाजूस ठेवलेल्या कॉम्प्रेसरच्या ठिकाणी ही आग लागली. चालक टेम्पो घेऊन जात असताना, त्याच्या बाजूने जाणाऱ्या वाहन चालकांनी टेम्पोच्या मागील बाजूने धूर येत असल्याची माहिती त्याला दिली.
त्यानुसार त्याने आपले वाहन बाजूला उभे केले, परंतु मागील बाजूस असलेले दरवाजे उघडणे त्याला शक्य झाले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचाऱ्यांनी दरवाजाचे लॉक तोडून ती आटोक्यात आणली, परंतु या घटनेतही टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने यातही कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.