मुंबई : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी येणा-या सर्व सामान्य भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी, या हेतूने एसटी महामंडळातर्फे अद्ययावत अशा यात्री निवास व बसस्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे महामंडळाने सांगितले.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या कामाचा भूमिपूजन सोहळा संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प.रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते रविवारी, ३ मार्चला होणार आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नगर येथे उद्धाटनाचा मुख्य कार्यक्रम संपन्नी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्यातील ३५५ तालुक्यांतून आलेल्या वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींची बैठक मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात बुधवारी झाली. यावेळी रावते यांनी ३३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणा-या या अद्ययावत यात्री निवास व सुसज्ज अशा बसस्थानकाच्या भूमिपूजनाचे निमंत्रण दिले. यावेळी रावते म्हणाले की, समर्पणाचा संस्कार शिकविणा-या वारकरी संप्रदायाच्या साक्षीने विठुरायाच्या दर्शनाला येणा-या सर्वसामान्य भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी हे यात्री निवास व बसस्थानक उभारले जाईल. त्याचे भूमिपूजन संतांच्या वंशजांच्या शुभहस्ते व्हावे, हा माऊलीचा आदेश होता. आम्ही शासनकर्ते निमित्तमात्र आहोत.यात्री निवासामुळे यात्रा व वारीच्या काळामध्ये एसटीच्या चालक-वाहकांची गैरसोय दूर होईल. तसेच यात्रा व वारी व्यतिरीक्त इतर दिवशी सर्वसामान्य भाविक प्रवाशांना हक्काच्या निवासाची सोय होणार आहे. यानिमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनाला येणाºया भाविकांची सेवा करण्याचे भाग्य एसटीला लाभेल, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला राज्यभरातील वारकरी साहित्य परिषदेचे ५००हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठलकाका पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. ह.भ.प. नामदेव महाराज शिवणीकर यांनी आभार मानले.