Bus Strike : 'परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 05:21 PM2021-11-12T17:21:27+5:302021-11-12T17:43:17+5:30
आझाद मैदानात गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला आहे. संदीप देशपांडे यांनीही आज संपात सहभागी होत, खासगी वाहतुकीला परवानगी दिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच दिलाय
मुंबई - राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. यावरुन राजकारण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजप नेते मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत आहेत. आमदार नितेश राणे देखील एसटी कर्मचाऱ्यांसोबत आज आंदोलनात उतरले आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही आझाद मैदानातून राज्य सरकारला इशारा दिला.
आझाद मैदानात गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला आहे. संदीप देशपांडे यांनीही आज संपात सहभागी होत, खासगी वाहतुकीला परवानगी दिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच दिलाय. जगातील कुठलंही सार्वजनिक ट्रान्सपोर्ट फायदात नाही, आणि ते फायद्यात नसतं. त्यामुळेच, त्याच्यावर होणाऱ्या खर्चाची, तोट्याची तरतूद करण्यासाठीच तुम्हाला ठेवलेलं असतं, असे म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ मी पाहिला. त्यामध्ये, मुख्यमंत्री नसताना ते म्हणत होते की, आमचं सरकार आल्यानंतर आमचा मंत्री मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन खाली येईल, आंदोलनकर्त्यांजवळ जाईल आणि मोर्चातील माता-भगिनींच्या प्रश्नांची विचारपूस करेन. मात्र, तुम्ही मंत्रालयातून खाली आला नाहीत. तुमचा मंत्रीही सहाव्या मजल्यावरुन खाली उतरला नाही. अनिल परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन खाली उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात. राज्यातील एसटी कर्मचारी आणि राज्यातील जनतेच्या मनातून उतरलात, अशी टीका मनसेनं केली आहे.
एक दिवसाचं विशेष अधिवेशन घ्या
राज्य सरकारने जर ऐकलं नाही, तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सरकारला दिला. तसंच एसटी कर्मचाऱ्यांसाठी एका दिवसाचं विशेष अधिवेशन घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. यातही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी हवतर मुंबईतच अधिवेशन बोलवा, नागपूरलाही नको, असं नितेश राणे म्हणाले.