मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसभाड्यामध्ये मोठी कपात केल्यानंतर, २०१९ पासून कमी अंतराच्या बसमार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. अशा ६० टक्के प्रवाशांसाठी ५३ रेल्वे स्थानकांशी जोडलेल्या कमी अंतराच्या मार्गांवर बससेवा सुरू करण्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाने केले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या बस तिकिटांचा किमान दर पाच रुपये ते कमाल २० रुपये करण्यात आले आहेत. जुलै, २०१९ मध्ये हा बदल केल्यानंतर कमी अंतराच्या बस मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. लॉकडाऊन शिथिल करून मुंबईतील सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतर, बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून सध्या दररोज २५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.
यापैकी तब्बल १५ लाख प्रवासी कमी अंतराच्या बस मार्गांवर प्रवास करीत असतात. यामध्ये विशेष करून घर ते रेल्वे स्थानक व कार्यालय ते रेल्वे स्थानक असा प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. कमी अंतरावरील वातानुकूलित बस गाडीचे प्रवासी भाडे सहा रुपये आहे. यापूर्वी शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या बहुतांशी प्रवाशांनी आता बेस्टच्या वातानुकूलित बससेवेला पसंती दिली आहे.
२०१९ नंतरची आकडेवारी
प्रवासाचे अंतर....प्रवासी
(कि.मी.)......टक्केवारी
० - ५...६०
५ - १०....२०
१० - १५ .....१५
१५ किमी. वरील ...०५
प्रवासी भाडे(२०१९)
प्रवासाचे अंतर(किमी)..तिकीट (साधे) ...एसी(रू.)
५....०५.....०६
१०...१०....१३
१५...१५....१९
१५...२०....२५