धाटाव : रोहा - कोलाड रस्त्यावरील बस थांब्याची सध्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, तर काही ठिकाणी निवारा शेड गायब असल्यामुळे प्रवाशांना रणरणत्या उन्हात वाहनांची प्रतीक्षा करत उभे राहावे लागत आहे. काही बसथांब्यांवर टपरी व्यावसायिकांनी अतिक्रमक केल्याचे दिसून येत आहे. याशिवाय याठिकाणी भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रोहा - कोलाड रस्त्यावरील वरसे, सुदर्शननगर, एक्सेल, धाटाव, सुदर्शन नाका, किल्ला, अशोकनगर, पालेखुर्द, संभे, आंबेवाडी व कोलाडपर्यंत असे एकूण ११ बस थांबे बांधण्यात आले होते. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या बसथांब्यांची आता पडझड होऊ लागली आहेत. अशोक नगर येथील बस थांब्याला गवताचा विळखा बसला असून पत्र्याची शेड गायब आहे. तर पालेखुर्द येथील बस थांबाच गायब झाल्यामुळे हा बस थांबा चोरीला गेला की काय, असा प्रश्न प्रवासी वर्गाला पडला आहे.काही बस थांब्यामधील आसनावर टपरी व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडून त्यांच्या वापरातील साहित्य या ठिकाणी व्यावसायिकांकडून ठेवले जात आहेत. याठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी असल्याने त्यांनीही बसथांब्यावर अतिक्रमण करून प्रवाशांमध्ये दहशत निर्माण केल्याचे दिसते. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी संबंधित प्रशासनाने सामाजिक संस्था, औद्योगिक वसाहतीतील कारखानदार वर्गाने सौजन्यता दाखवून बस थांब्याची किमान डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
निवारा शेडअभावी बस प्रवासी उन्हात
By admin | Published: May 24, 2015 10:45 PM