Join us

कोरोना निर्बंधांमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांचा व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी जारी करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळे रिक्षा-टॅक्सीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेले लाखो चालक-मालक अस्वस्थ झाले आहेत. नव्या ...

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी जारी करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांमुळे रिक्षा-टॅक्सीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेले लाखो चालक-मालक अस्वस्थ झाले आहेत. नव्या निर्बंधांमुळे दुसऱ्या पाळीतील व्यवसाय कोलमडला आहे.

स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी म्हणाले की, रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेतील नव्या निर्बंधांमुळे दुसऱ्या पाळीत बाहेर पडलेल्या चालकांना ग्राहक नसल्याने रिकाम्या हाती घरी परतावे लागते. अनेक चालक बेरोजगार होत आहेत. मुंबईत सुमारे ४८ हजार टॅक्सी, तर ३ लाख रिक्षा आहेत. ही वाहने सकाळ आणि रात्र अशा २ पाळ्यांमध्ये रस्त्यावर धावत असतात. एका पाळीत मालक, तर दुसऱ्या पाळीत चालक वाहन चालवतो. काही वाहने दोन्ही पाळ्यांमध्ये चालकांच्या हाती असतात. त्यामुळे जितकी वाहने तितके चालक या व्यवसायावर अवलंबून आहेत.

तर रिक्षाचालक मनोज गांगुर्डे म्हणाले की, आता दिवसाला ३०० रुपयांचादेखील व्यवसाय होत नाही. रिक्षा दोन शिफ्टमध्ये अनेकजण चालवत होते, पण दुसरी शिफ्ट सायंकाळी ५ वाजता सुरू होते आणि रात्री ८ वाजता बंद करावी लागते. रिक्षा चालवायची किती आणि मालकाला किती पैसे द्यायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे अनेकजणांनी सायंकाळी रिक्षा चालवणे बंद केले आहे.