दिवसाला पूर्वी मिळायचे १२०० रुपये; आता ५०० रुपयांचा व्यवसाय हाेणेही अवघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाने भल्याभल्यांचे तोंडाचे पाणी पळविले आहे. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण याच्या तावडीत सापडला आहे. अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चाकू-सुरीला धार लावणाऱ्या, भाजी चिरण्यासाठीच्या चाकू -सुरुची विक्री करणाऱ्या कारागिरांचा ही धंदा काेराेनामुळे मंदावला आहे. कोरोना, लॉकडाऊनपूर्वी चाकू-सुरीला धार लावणारे कारागीर दिवसाला १२०० रुपये कमवत होते. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनामुळे आता दिवसाला ५०० रुपयेही मिळवणे अवघड झाल्याची खंत या कारागिरांनी व्यक्त केली.
चाकू-सुरीला धार लावणारे बहुतांश कारागीर हे उत्तर भारतातील आहेत. यापैकी अनेक जणांनी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावाकडे धाव घेतली आहे. जे उरले आहेत ते कसेबसे व्यवसाय करत आहेत. अशाच एका कारागिराशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्याने सांगितले की, कोरोनामुळे आमची अवस्था फारच वाईट झाली आहे. मुंबईपासून गावापर्यंत सर्वच ठिकाणी कोरोनाचा विळखा आहे. आमची तर फारच वाईट अवस्था आहे. सगळेच बंद आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. कोरोना नव्हता, लॉकडाऊन नव्हते तेव्हा आम्ही दिवसाला १२०० रुपये कमावत होतो. मात्र आता दिवसाला ५०० रुपयेही मिळत नाहीत. खूप कष्ट करावे लागतात. खूप फिरावे लागते. काेराेना प्रतिबंधात्मक निर्बंधांचे पालन करुनच हे सर्व करावे लागते. आरोग्याची काळजीही घ्यावी लागते. सगळे आर्थिक गणित बिघडले आहे, असेही त्याने सांगितले.
* साेसायट्यांमध्ये प्रवेश नाही
चाकू-सुरीला धार लावणारे कारागीर धारावीसह मानखुर्द, गोवंडी, मालाड, अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, माहीमसह झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. हॉटेलसह चाळी, झोपड्या आणि इमारतीमधील अनेक ठिकाणी हे कारागीर चाकू-सुरीला धार लावण्यासाठी फिरत असतात. हॉटेलमधील चाकू-सुरीला धार लावण्याचे काम हे कारागीर करतात. गृहिणी ही घरातील भाजी चिरण्याच्या चाकू-सुरीला यांच्याकडूनच धार लावून घेतात. अनेक वेळा भाजी चिरण्यासाठीचा चाकू - सुरी या कारागिरांकडून विकत घेतली जाते. टेलर दुकानदारही वस्त्रे कापण्याच्या कैचीला यांच्याकडून धार लावून घेतात. आज कोरोनामुळे यांच्या फिरण्यावर बंधने आली आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये यांना प्रवेश नाकारला जातो. संपूर्ण दिवसभर फिरून ही हाती फार काही येत नसल्याची खंत या कारागिरांनी व्यक्त केली.
................................