उद्योजक दिलीप डहाणूकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:12 AM2018-03-12T05:12:51+5:302018-03-12T05:12:51+5:30
उद्योजक दिलीप डहाणूकर यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे ते पती होते.
मुंबई : उद्योजक दिलीप डहाणूकर यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे ते पती होते. डहाणूकर यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रफुल्ला डहाणूकर यांच्या निधनानंतर दिलीप यांनी प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांना कलेची आवड होती. डहाणूकर यांनी स्वत:जवळ अनेक चित्रे आणि शिल्पांचे संकलन केले होते.
प्रफुल्ला डहाणूकर यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरविण्यासाठी ते जात असत. त्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला. नवकलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे याकरिता प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली. फाउंडेशनतर्फे ‘कलानंद’ स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात येते.