Join us

रेल्वे पुलावर व्यावसायिकाला सहा जणांनी लुटले; नवघर पोलिसांनी चौकडीला ठोकल्या बेड्या

By मनीषा म्हात्रे | Published: November 19, 2023 4:08 PM

याप्रकरणी नवघर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदवत चार जणांना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाहूर येथील रेल्वे पुलावरून जात असलेल्या ४० वर्षीय व्यावसायिकाला सहा जणांच्या टोळीने लुटल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदवत चार जणांना अटक केली आहे.

दातार कॉलनी रोड परिसरात ४० वर्षीय तक्रारदार ज्ञानदेव कदम राहण्यास आहे. १५ तारखेला सकाळी पाच ते सव्वा पाच च्या सुमारास ही घटना घडली. मुलुंड गोरेगाव लिंक रोड येथील नाहूर रेल्वे पुलावरून पायी जात असताना सहा जणांनी त्यांना अडवले. गळयातील सोन्याची चैन खेचून, घड्याळ, एटीएम कार्ड काढून कार आणि टेम्पो मधून पसार झाले. या घटनेने तक्रारदार यांना धक्का बसला. शनिवारी त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही, तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. निसार मोहम्मद मुस्ताकअली खान (३०, नवी मुंबई), अलीरजा छोटे मिया मिर्झा (३४,गोवंडी),  मोहम्मद अश्रफअली अजगरअली खान ( २४, मानखुर्द), झिशान नसर सिध्दीकी (२१, गोवंडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे. अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :गुन्हेगारी