तीन वर्षांच्या शिक्षेविरोधात व्यावसायिकाची उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:41 AM2020-02-25T03:41:39+5:302020-02-25T03:42:03+5:30
अल्पवयीन अभिनेत्री विनयभंग प्रकरण
मुंबई : बॉलीवूडमधील अल्पवयीन अभिनेत्रीबरोबर विमानात झालेल्या विनयभंगाप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने व्यावसायिक विकास सचदेव याला पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत, तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठाविली. या निर्णयाविरोधात विकास सचदेव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
१५ जानेवारी, २०२० रोजी दिंडोशी सत्र न्यायालयाने सचदेव याला भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३५४ आणि पॉक्सोअंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा ठोठाविली. त्याच दिवशी सत्र न्यायालयाने सचदेव याची २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करत तीन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली. २० फेब्रुवारी रोजी सचदेव याने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
अपिलात त्याने सर्व आरोप फेटाळले. ट्रायल कोर्टासमोर साक्ष देताना पीडितेने आपल्याला ओळखले नाही. त्यामुळे शिक्षा रद्द करण्यास ही योग्य केस आहे, असे सचदेव याने अपिलात म्हटले आहे. त्याच्या अपिलावर २ मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
९ डिसेंबर, २०१७ रोजी विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून दिल्लीहून मुंबई असा प्रवास करताना, मागच्या सीटवरील विकास सचदेवने आपला विनयभंग केल्याचा आरोप संबंधित अभिनेत्रीने केला. तिने इन्स्टाग्रामद्वारे ही घटना उघडकीस आणली. लोकांनी याची गांभीर्याने दखल घेतली. मात्र, विकास याची पत्नी दिव्या सचदेव यांनी संबंधित अल्पवयीन अभिनेत्रीने केलेले सर्व आरोप फेटाळले. पीडिता केवळ प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला.