लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कल्याण येथील मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीची घटना असो की मध्यंतरी गिरगावातील घटना असो. अशा वेळी इतर पक्ष मदतीला धावून येण्याची खात्री नसल्यामुळे सर्वांना मनसेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात. मात्र, मतदानावेळी हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी आपला संताप व्यक्त केला आहे.
कल्याणमधील गुरुवारी झालेल्या या प्रकरणानंतर महाराष्ट्र सैनिक शुक्ला नावाच्या माणसाला प्रसाद द्यायला गेले होते.
लोकप्रतिनिधी गप्प का?
महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला, गुप्ता राहत आहेत. प्रत्येक वेळी ते मराठी माणसाला किती वाकवता येईल हे बघत असतात. महाराष्ट्रद्वेषींच्या या नवीन पिलावळीला वेळीच आवर घातला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. कल्याणच्या घटनेनंतर तिथले खासदार, आमदार व्यक्त झाले नाहीत. मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत. सर्व आमदार, खासदार यांनी मराठी जनतेला गृहीत धरले आहे. आमिषे दाखविली की हे मतदान करतात हे त्यांनी पुरते ओळखले आहे. त्यामुळे मराठी माणसाने वेळीच जागे व्हावे नाही तर ते तुम्हाला कधी नेस्तनाबूत करतील ते कळणारही नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.