मुंबई : कल्याण ते कसारादरम्यान वाढीव लोकल फेऱ्यांसाठी तिसरी मार्गिका उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. प्रकल्पातील ७३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. इतरही कामे प्रगतिपथावर आहेत. हा प्रकल्प मार्च, २०२६ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. कल्याण - कसारा दुहेरी रेल्वे मार्ग आहे. टिटवाळा, आसनगाव, कसारा आदी परिसरात लोकवस्ती वाढल्याने प्रवासीसंख्या वाढत आहे. कल्याण-कसारादरम्यान केवळ दोनच मार्गिका असल्याने अनेकदा लोकलपेक्षा मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य द्यावे लागते. परिणामी लोकल उशिराने धावतात. एक्स्प्रेस किंवा मालगाडीचा अपघात झाल्यास रेल्वेमार्ग बंद होतो. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे उपनगरी सेवेला फटका बसतो. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका बनवण्यासाठी सन २०११ मध्ये मंजुरी दिली. त्यानुसार २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र मार्गिकेसाठी भूसंपादन प्रक्रियेत अडचणी येत असल्याने हा मार्ग अद्याप रखडला होता मात्र आता या कामाला गती मिळाली आहे.
कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेची एकूण लांबी ६७.३५ किमी आहे. प्रकल्पासाठी ४९.२३ हेक्टर जमीन आवश्यक असून, यापैकी ३५.९६ हेक्टर अर्थात ७३ टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. १३.२७ हेक्टर जागेच्या संपादनासाठी प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पात ८.२३ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. प्रकल्पासाठी ७९२.८९ कोटी खर्च अपेक्षित आहे.
कल्याण ते कसारा तिसरी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर कल्याण कसारा मार्गावरील लोकल आणि मेल एक्स्प्रेसमधील गर्दी कमी होईल. तसेच यामुळे मार्गिकेमुळे प्रवास वेगवान होईल.- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे