सोंगाड्या, पवळ्या अशा नावांनी ओळखली जाणार फुलपाखरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 04:34 AM2019-06-07T04:34:24+5:302019-06-07T04:34:33+5:30

राज्यातील फुलपाखरांना मिळाली मराठी भाषिक नावे : जैवविविधता मंडळाच्या मान्यतेनंतर अंतिम शिक्कामोर्तब

The butterflies to be known by such names as Songdas, | सोंगाड्या, पवळ्या अशा नावांनी ओळखली जाणार फुलपाखरे

सोंगाड्या, पवळ्या अशा नावांनी ओळखली जाणार फुलपाखरे

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्वच फुलपाखरांना मराठमोळ्या भाषेतील नावे असावीत. म्हणजे ती लक्षात राहण्यास सोपी जातील व त्यातून अनेक फुलपाखरांची सर्वसामान्यांना ओळखसुद्धा होईल. यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली होती. ११ मेपर्यंत फुलपाखरांना नावे सुचविण्याचा अवधी सर्वसामान्यांना देण्यात आला होता. त्यानुसार फुलपाखरांना नीलपर्ण, सोंगाड्या, ढवळ्या, पवळ्या, रत्नमाला, झिंगोरी इत्यादी मराठी भाषिक नावे देण्यात आली आहेत.

माहिती समितीचे सदस्य तथा समिती सदस्य डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले की, राज्यातून भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (झेडएसआय) वन विभाग, फुलपाखरू तज्ज्ञ आयझँक केहीमकर, विद्यार्थी गार्गी गिद, प्रा. अमोल पटवर्धन, प्रा. सुधाकर कुºहाडे, अभय उजागरे अशा एकूण २५ संस्था, व्यक्ती, अभ्यासक तथा फुलपाखरू प्रेमींकडून सुमारे ३७७ नावे तसेच फुलपाखरांच्या कुळांची नावे आणि काही मौलिक सूचना प्राप्त झाल्या होत्या. या नावांचा, सूचनांचा तसेच निकषांचा विचार करून या मराठी नावांच्या यादीस अंतिम स्वरूप देण्यात आले. यासाठी या समितीची अंतिम बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली. त्यामध्ये ठरविण्यात आलेल्या नावांस मान्यतेसाठीची शिफारस राज्य जैवविविधता मंडळाकडे करण्यात आली असून मंडळाच्या बैठकीत या यादीस मान्यता मिळू शकेल. ही मान्यता लवकरच मिळेल, अशी माहिती डॉ. वडतकर यांनी दिली.

सुप्रसिद्ध फुलपाखरू अभ्यासक व मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी यासंदर्भात सांगितले की, फुलपाखरांची मराठी नावे त्यांचे रंग, रूप, आकार, सवय, दिनक्रम, आवडी-निवडी, खाद्य वनस्पती तसेच आवश्यक तेथे इंग्रजी नावांचे भाषांतर, संस्कृत भाषा व पौराणिक ऐतिहासिक संदर्भ इत्यादी निकषांचा विचार करून देण्यात आली आहेत. नावानिशी फुलपाखरू ओळखता यावे तसेच उच्चारण्यास सोपे, सहज तोंडी बसेल यासाठी काही ठिकाणी बोली भाषेतील शब्दांचा वापर करून ही नावे ठरविण्यात आली आहेत. यापूर्वी डॉ. संजीव नलावडे, डॉ. राजू कसंबे यांच्या पुस्तकात आलेली आणि काही प्रचलित नावांचासुद्धा या वेळी विचार करण्यात आला आहे. यादीस मंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता प्राप्त झाल्यानंतर या नावांचा प्रचार व प्रसार करून ही नावे सर्वमान्य होण्यासाठी प्रयत्नसुद्धा करण्यात येतील.

अशी मिळणार नवी ओळख
नीलायम, नीलपर्ण, भोंडी, नीलरेखा, भीमपंखी, बहुरूपी, सोंगाड्या, भटक्या, गोलू, मदालसा, पट्टमयूर, ढवळ्या, पवळ्या, भिरभिरी, हबशी, केशरटोक्या, शेंदूरटोक्या, नीलाम्रुद, नीलबाभळी, अशोकासक्त,रुपरेखा, रत्नमाला, झिंगोरी, तरुछाया, तरंग, झुडपी, हुप्या, ताडपिंगा, रूईकर अशा नावांची नवी ओळख फुलपाखरांना मिळणार आहे. याशिवाय फुलपाखरांच्या नील, चपळ, कुंचलपाद, पुच्छ, पितश्वेत, मुग्धपंखी अशा सहा कुळांनासुद्धा नावे देण्यात आली आहेत.

Web Title: The butterflies to be known by such names as Songdas,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.