मुंबई : आज जागतिक फुलपाखरू दिवस आहे. वडिलांच्या आठवणी म्हणून त्यांच्या नावे स्मृतिस्तंभ
अनेक जण उभारतात. २०१५पूर्वी ओसाड असलेल्या गोरेगाव पूर्व येथील संदीप आठल्ये यांनी पर्यावरणप्रेमी असलेल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क गोरेगाव पूर्व येथील निसर्गरम्य आरेच्या दुग्धशाळेसमोरील दोन एकर जागेत मोहक फुलपाखरू उद्यान ८ मे २०१६ विकसित केले आहे.
सकाळी येथे फुलपाखरांचा मोठा राबता असतो आणि खास त्यांच्यासाठी येथे वृक्षलागवड केली जाते. येथे बटरफ्लाय वॉक तयार केला असून येथे सुमारे १००हून विविध जातींची फुलपाखरे असून देशी व विदेशी पर्यटक आवर्जून येथे येतात. येथे फुलपाखरांविषयी सविस्तर माहिती पर्यटकांना दिली जाते.
वडील दिवंगत विनय आठल्ये यांनी काही वर्षांपूर्वी आरे कॉलनीत एक निसर्ग उत्साही पर्यावरणप्रेमी म्हणून ३५००पेक्षा जास्त झाडे लावली होती. २०१५ साली वडिलांच्या निधनानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आणि फुलपाखरू बागेत संशोधन करण्यास सुरुवात केली. आरे दुग्धशाळेजवळ फुलपाखरू उद्यान करण्यासाठी झाडे लावणे. आरंभ करण्यापूर्वी संशोधन केले आणि आरे दुग्ध कॉलनी परिसरातील आणि त्या आसपासच्या फुलपाखरांविषयी विविध अहवालांचा अभ्यास केला, अशी माहिती संदीप आठल्ये यांनी लोकमतला दिली.
या उपक्रमाबद्दल बोलताना संदीप आठल्ये म्हणाले की, “माझ्या वडिलांनी येथे मोठ्या प्रमाणत वृक्ष लावले आणि येथे फुलपाखरू बाग तयार करायची इच्छा होती. २०१६ साली त्यांचे निधन झाल्यानंतर सुमारे दोन एकर जागेत मोहक फुलपाखरू उद्यान साकारून वडिलांचे स्वप्न साकार केले. आतापर्यंत विविध प्रकारची सुमारे ७० अमृत वनस्पतींची लागवड केली आहे. अमृत वनस्पती फुलपाखरे आकर्षित करतात. या उपक्रमासाठी बऱ्याच लोकांनी त्यांच्या सूचना दिल्या. आम्ही आरे कॉलनी आणि संजय गांधी नॅशनल पार्क (एसजीएनपी) संबंधित पुस्तकांचा अभ्यास केला. हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आम्ही एसजीएनपी आणि भवन्स कॉलेज अंधेरीची फुलपाखरू बाग बघितले.
ऑनलाइन संशोधनानुसार आरे कॉलनीत १०० प्रकारची फुलपाखरे आहेत, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १६०हून अधिक फुलपाखरे आहेत. सदर फुलपाखरू उद्यानात विकसित करण्यासाठी आई- आरती आठल्ये, पत्नी- वरदायिनी आठल्ये, मुलगा- मल्हार आठल्ये आदींचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरे दुग्ध कॉलनीचे माजी सीईओ गजानन राऊत यांनीही या उपक्रमाचे समर्थन केले होते. राऊत म्हणाले, “हा उपक्रम फुलपाखरू आणि इतर पक्ष्यांच्या विविध प्रजाती आकर्षित करण्यास मदत करेल. पुढच्या टप्प्यात आम्ही फुलपाखरे आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यजमान वनस्पतींची लागवड करण्याचे ठरवले. त्यानंतर येथे अनेक वेळा वृक्षारोपण करण्यात आले आणि या प्रकल्पात स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी अनेक नागरिक पुढे आले आहेत. आतापर्यंत सुमारे ५०००हून अधिक देशी व विदेशी नागरिकांनी या फुलपाखरू उद्यानाला भेट दिली आहे असे त्यांनी संगितले.