मुंबई विद्यापीठात फुलपाखरांचे उद्यान आणि मियावाकी जंगल
By सीमा महांगडे | Published: October 15, 2022 08:18 PM2022-10-15T20:18:07+5:302022-10-15T20:18:47+5:30
मुंबई विद्यापीठ आणि रोटरी क्लबचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क,
मुंबई: पक्षांची किलबिल, मधमाशांची भुणभुण, पानांची सळसळ आणि त्याजोडीला हिरव्यागार वनस्पती आणि झाडीचा तजेलदार सहवास... आणि हे सर्व शहराच्या अगदी मध्यभागी! मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने कलिना संकुलात तयार करण्यात आलेले जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी)पार्क शनिवारपासून खुले करण्यात आले. मियावाकी जंगल , फुलपाखरू उद्यान आणि नक्षत्र उद्यान ही तीन सुंदर उद्याने येथील महत्त्वाची आकर्षणे ठरणार आहेत.
या पार्कच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर, कुलसचिव सुधीर पुराणिक, एचडीएफसी एएमसी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नवनीत मुनोत, रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर संदीप अगरवाला, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री विनीत भटनागर यांच्या उपस्थित आजचा उदघाटन सोहळा पार पडला. मियावाकी जंगल, सेन्सरी पार्क, पक्षी निवारा, फुलपाखरांचे गार्डन आदी नाविन्यपूर्ण संकल्पनांमधून एकराहून अधिक जागेवर हे जैवविविधतेचे अनोखे रुप साकारले आहे. त्याचबरोबर तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे (आरसीबी)ने मुंबई विद्यापीठाबरोबर १० वर्षांचा सामंजस्य करार केला असून त्याद्वारे एक एकरहून अधिक जमिनीवर असलेले हे पार्क सांभाळले जाणार आहे. त्यासाठी मेगा स्केप इंडिया (एमजीएस)ला तांत्रिक तज्ज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापन भागीदार नेमले असून त्यातून हे पार्क उभे राहिले आहे. एमजीएसमध्ये अनेक पर्यावरणतज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प राबविले जातात. अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने हे पार्क त्यांनी साकारले आहे.
पर्यावरण संरक्षण परिसंस्थेसाठी आवश्यक
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करायचे असेल तर जैवविविधता ही आजची आणि उद्याचीही महत्त्वाची गरज आहे. जैवविविधता हे निसर्गाने कोणत्याही आपत्तीविरोधात आपल्याला दिलेले सुरक्षाकवच आहे. या विविधतेमध्ये पृथ्वीवरील सर्व स्तरावरील विविध प्रकार सामावलेले असतात आणि त्यातून जीवनाला सार्थ ठरविणाऱ्या पर्यावरणीय आणि सांस्कृतिक प्रक्रिया घडत जातात. त्याचमुळे पर्यावरणाचे संरक्षण हा केवळ भावनिक वा सौंदर्यात्मक मुद्दा नाही तर मानवाला आणि संपूर्ण परीसंस्थेसाठी तो कळीचा मुद्दा आहे अशी प्रतिक्रीय रोटरी इंटरनॅशनल डीस्ट्रीक्ट ३१४१ चे गव्हर्नर संदीप अगरवाला यांनी दिली.
नागरी भागातील नैसर्गिक स्त्रोतांचे नाविन्यपूर्ण व सकारात्मक दृष्टीने लक्ष घालत संवर्धन करणे, या दृष्टीकोनातून कलिना बायोडायव्हर्सीटी पार्कची निर्मिती झाली आहे. वनस्पती आणि प्राणी विविधता यातून आरोग्यपूर्ण परिसंस्था निर्माण होते. शहरी भागाचे पर्यावरण सुधारण्यासाठी बायोडायव्हर्सीटीचा उपयोग होतो आणि त्यातून शिक्षण, सांस्कृतिक व संवर्धानात्मक उपक्रमांना चालना मिळते. - विनीत भटनागर, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने रोटरी क्लबच्या सहाय्याने हाती घेतलेला हा अत्यंत स्तूत्य उपक्रम आहे - प्रा. शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी कुलसचिव
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"