विद्यापीठाच्या परिसरात बहरणार फुलपाखरांची उद्याने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:22+5:302021-06-06T04:06:22+5:30

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कुलगुरू; प्र-कुलगुरूंकडून विविध प्रजातींच्या रोपांची लागवड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जैवविविधतेसाठी पूरक वातावरण असणाऱ्या कालिना ...

Butterfly gardens to flourish on the campus! | विद्यापीठाच्या परिसरात बहरणार फुलपाखरांची उद्याने!

विद्यापीठाच्या परिसरात बहरणार फुलपाखरांची उद्याने!

Next

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कुलगुरू; प्र-कुलगुरूंकडून विविध प्रजातींच्या रोपांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जैवविविधतेसाठी पूरक वातावरण असणाऱ्या कालिना संकुलात आणि मरिन ड्राइव्ह संकुलात आता पाच हजार चौरसफूट जागेवर एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत दोन्ही परिसरात फुलपाखरू उद्याने तयार होत आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दोन्ही परिसरात सुमारे एक हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. घाणेरी, जास्वंत, मोगरा, कणेर, टगर, जमाईकन स्पाईक, लिंबू, गाल्पेनिआ, अबोली, पेव, कृष्णकमळ, पेंटास, हॅमेलिया, इक्झोरा, सोनचाफा अर्जुन, तुती आणि कोलियस अशा विविध प्रजातींची सुगंधी आणि शोभेच्या रोपांची लागवड येथे करण्यात आली आहे. प्रोजेक्ट मुंबई व मेकिंग द डिफरंस या सेवाभावी संस्थांनी या दोन्ही उद्यानांसाठी रोपे पुरवल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

पर्यावरणदिनी केवळ पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करणे हा संदेश देणे उपयोगाचे नसून, त्यातील परिसंस्था काय आहे, जैवविविधता काय आहे? ती कशी टिकवली जाऊ शकते आणि त्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो, या सर्व गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. प्रदूषणाचा विळखा पडलेल्या मुंबईमध्ये आजही अनेक कालिना संकुल परिसरासारखे भाग आहेत, जिथे परिसंस्था आणि जैवविविधता यांची उदाहरणे आहेत आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी पूरक वातावरणही आहे. याच कारणास्तव मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते कलिना कँपस येथे तर मरीन ड्राइव्ह कँपस येथे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. आयुर्वेद आणि वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना अभ्यासासाठी उपयोगी पडतील, अशा विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली असून, या सर्वांत निसर्गाच्या रंगांची मुक्त उधळण होण्यासाठी फुलपाखरांची उद्यानेही तयार करीत असल्याचे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले.

या आधीही सरपटणारे प्राणी, ऋतुमानाप्रमाणे बहरणारी फुलझाडे, स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या प्रजाती, किडे, मुंग्या अशा जैविक विविधतेसाठी कालिना संकुलाचा परिसर म्हणजे घरकुलच असल्याचे समोर आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण या दोन्ही विभागांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

* पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करणे गरजेचे

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट आणि विद्यानगरी परिसरात अनेक दुर्मीळ प्रजातींचे वृक्ष आणि ऋतुमानाप्रमाणे बहरणारी फुलझाडे आहेत. या जैवविविधतेच्या परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिओ टॅगिंग आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून इत्थंभूत माहिती उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पालाही सुरुवात करण्यात आली आहे. आपली वसुंधरा अधिकाधिक सुंदर होण्यासाठी व तिचे सरंक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करणे गरजेचे आहे.

- प्रा. सुहास पेडणेकर,

कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

----------------------------------------

Web Title: Butterfly gardens to flourish on the campus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.