Join us

मुंबईच्या बाजारपेठांत दसऱ्याला १० टन सोन्याची खरेदी-विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 12:49 AM

पारंपरिक मंगळसूत्रे, अंगठ्या, नेकलेस, बांगड्या, कानातले दागिने, सोन्याची नाणी इत्यादींची खरेदी जोरात होत होती.

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो; हे निमित्त साधत मंगळवारी मुंबई शहर व उपनगरातील सराफांकडे ग्राहकांनी गर्दी केली होती. मंगळवारी सोने प्रति तोळा ३८,४८० रुपये असतानाही ग्राहकांनी सोने खरेदीवर भर दिला. यंदा सोन्याचा भाव काहीसा वाढला असला, तरी सोने बाजारात सकारात्मक वातावरण होते, अशी माहिती सराफांनी दिली.पारंपरिक मंगळसूत्रे, अंगठ्या, नेकलेस, बांगड्या, कानातले दागिने, सोन्याची नाणी इत्यादींची खरेदी जोरात होत होती. दरम्यान, दसºयाच्या मुहूर्तावर देशभरात १० टन सोन्याची खरेदी-विक्री झाली असून, दिवाळीला सोने प्रतितोळे ४० हजारांवर जाईल, असा अंदाज सराफांनी वर्तविला.जुलै महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क सरकार कमी करेल आणि त्यामुळे सोन्याचे दर आटोक्यात येतील, अशी आशा ग्राहकांना होती. मात्र, सोन्यावरील सीमा शुल्क २.५ टक्क्यांनी वाढविण्यात आले. पूर्वी दहा टक्के असलेले हे शुल्क आता १२.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे, तरीही सोन्याची झळाळी मात्र कायम आहे.इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, देशभरात दरवर्षी दसºयाच्या मुहूर्तावर २० टन सोन्याची खरेदी-विक्री होते, परंतु यंदा दसºयाला १० टन सोन्यांची खरेदी-विक्री झाल्याचा अंदाज आहे. सध्या बाजारात सोन्याचा भाव ३८ हजार रुपये आहे. मंदीमुळे ग्राहकांच्या हातात पैसा कमी आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर ४० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.धनत्रयोदशीची उलाढाल निम्मी होणार?आयात शुल्क वाढविल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असल्याने यंदा धनत्रयोदशीला सोन्याची उलाढाल निम्म्याने कमी होईल, असा अंदाज इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने वर्तविला आहे. दरवर्षी साधारण ४० टन सोन्याची उलाढाल होते. गेल्या वर्षी ८१.७१ टन सोन्याची आयात झाली होती. ती यंदा ६८.१८ टक्के घटून अवघी २६ टन झाली आहे. त्याचा फटका दिवाळीत बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दर आणखी वाढतील आणि त्याचा फटका खरेदीला बसेल, अशी चिंताही संघटनेने वर्तविली.

टॅग्स :सोनं