Join us

सकाळी ७ ते ११पर्यंतच खरेदी करा मोफत धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना एक महिना मोफत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना एक महिना मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. दिनांक १ मेपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु, सकाळी ७ ते ११ यावेळेतच धान्य मिळत असल्याने रेशन दुकानांवर मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

‘ई-पॉस’वर अंगठा लावण्याची सक्ती कोरोना काळात हटवल्याने रेशन दुकानांवरून कोरोना प्रसाराचा धोका कमी झाला होता. परंतु, आता नव्या निर्बंधांनुसार सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेतच खुली ठेवण्यास परवानगी दिल्याने पेच निर्माण झाला आहे. मोफत धान्य मिळवण्यासाठी मुंबईतील प्रत्येक रास्त धान्य दुकानाबाहेर शिधापत्रिकाधारकांची झुंबड उडत आहे. या गर्दीतून कोरोना प्रसाराचा धोका वाढल्याने संध्याकाळपर्यंत धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी दुकानदारांची मागणी आहे.

..............

एकूण रेशनकार्डधारक - ३२,९७,६२१

बीपीएल – २३,७२९

अंत्योदय – २०,६१४

केशरी – ३२,५३,२१४

..............

रेशन दुकानावर सॅनिटायझर राहणार का?

बायोमेट्रिक पद्धत काही काळासाठी स्थगित केल्याने ग्राहकांना हात निर्जंतूक करण्यासाठी रेशन दुकानातील सॅनिटायझर वापरावा लागणार नाही. तरीही प्रत्येक रास्त धान्य दुकानदाराला सॅनिटायझर ठेवण्याची सूचना केली आहे. एखाद्या दुकानदाराने मागणी केल्यास त्याला पुरवठा विभागाकडून सॅनिटायझर पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या संबंधीच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांनी दिली.

......

रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?

सकाळी ७ ते ११ यावेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने शिधापत्रिकाधारकांची झुंबड उडत आहे. मोफत धान्य मिळवण्याच्या नादात सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाभान उरत नाही. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे संध्याकाळी ८ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने नियोजन करता येईल, असे संघर्ष नगर येथील रास्त धान्य दुकानदार अर्जुन बडेकर यांनी सांगितले.

.................

संध्याकाळी ८ वाजेपर्यंत रास्त धान्य दुकाने सुरू ठेवल्यास दुकानदारांना गर्दीचे नियोजन करता येईल. त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शिधापत्रिकाधारकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे सूचना फलक प्रत्येक दुकानासमोर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

-प्रशांत काळे, उपनियंत्रक, पुरवठा विभाग

..............

फोटो ओळ – संघर्षनगर चांदिवली येथील रेशन दुकानासमोर मोफत धान्य खरेदीसाठी झालेली गर्दी.