मुंबई : बाजारात उपलब्ध असणाऱ्या स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटविरोधात ट्रॅक्स रोड सेफ्टी सोसायटी संस्थेच्या वतीने रविवारी जुहू येथे हेल्मेट इंडिया कँपेन राबविण्यात आले. वाहतूक पोलीस व मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पोलिसांकडून नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून देण्यात आले. विशेषतः दुचाकीस्वारांना हेल्मेटविषयी माहिती देण्यात आली. कोणते हेल्मेट वापरावे व कोणते वापरू नये याविषयी दुचाकीस्वारांना समजविण्यात आले. ट्रॅक्स ही संस्था मागील आठ वर्षांपासून निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटविरोधात लढा देत आहे. भारतात दरवर्षी सुमारे ४५ हजार दुचाकीस्वारांचे प्राण हेल्मेट न घातल्याने तसेच निकृष्ट दर्जाचे हेल्मेट घातल्याने होतात. यामुळे स्वस्त हेल्मेट विकत न घेता आयएसआय दर्जा प्राप्त असणारे चांगल्या दर्जाचे हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन यावेळी दुचाकीस्वारांना करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्याकडील निकृष्ट दर्जाचे हेल्मेट जप्त करण्यात आले. त्या बदल्यात त्यांना आयएसआय दर्जा प्राप्त असणारे चांगल्या दर्जाचे हेल्मेट मोफत देण्यात आले.
स्वस्त हेल्मेटपेक्षा आयएसआय मार्क असणारे हेल्मेट घ्या, दुचाकीस्वारांना आवाहन, निकृष्ट हेल्मेटविरोधात मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 1:31 AM