विरार : व्यवसायासाठी कार खरेदी करण्याचे स्वप्न दाखवणारी जाहिरात सोशल मीडियावर देऊन १००हून अधिक लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालून वसईतील झा बंधू पसार झाले आहेत. वालीव पोलीस ठाण्यात शुक्रवारपासून तक्रारदारांनी गर्दी केली आहे. संदीप झा आणि सुनील झा यांनी गोखीवरे येथे भाड्याच्या जागेत कारबेरी नावाचे वाहनांचे शोरूम उघडले होते. टुरीस्ट कंपन्यांमध्ये कार भाड्याने देऊन व्यवसाय सुरू करण्याची संधी असून कारबेरीकडून कार खरेदी करून घरबसल्या पैसे कमवा अशी जाहिरात सोशल मीडियावर केली होती. त्यांनी माजिवडा (ठाणे) आणि ओशिवरा (मुंबई) येथेही कार्यालये सुरू केली. तीन महिन्यांत १००हून अधिक लोकांनी कारबेरीकडे पैसे भरले होते. ४० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम शेकडो लोकांनी भरली होती. तीन महिने उलटून गेले तरी गाड्या आल्या नाहीत. उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती आणि आठ दिवसांपूर्वी अचानक सर्व कार्यालये बंद झाली. झा बंधू आणि कर्मचाऱ्यांचे फोनही बंद झाले. कालपासून वालीव पोलीस ठाण्यात तक्रारदार गोळा होऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)कर्ज काढले, दागिने विकले...रक्कम भरल्यानंतर टी परमिट काढून गाडी खरेदी करता येईल. गाडी टुरिस्ट कंपन्यांना भाड्याने दिली जाईल. भाडे गाडीच्या मालकाला दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. अनेकांनी कर्ज काढून दागिने विकून पैसे भरले आहेत. ‘आतापर्यंत ४० लोकांनी तक्रार केली आहे. फसलेल्यांची संख्या शंभरहून अधिक आहे,’ असे गणेश मिश्रा या तक्रारदाराने सांगितले.
कार खरेदीत लाखोंचा गंडा
By admin | Published: August 28, 2016 1:26 AM