मुंबई : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी १५ दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ९२ गुन्हे नोंदवले. संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजामुळे कुठे पक्षी जखमी झाले, तर मुंबईत एका पोलिसासह तरुणाला जीव गमावावा लागला. पतंगाच्या दोरमुळे घरातील कर्ता माणूस गमावल्याने कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पंतग उडवल्या जातात. मात्र, पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरण्यात येत असल्यामुळे पशूपक्षी जखमी होण्याबरोबर त्यांचे प्राण जाण्याचाही मोठा धोका असतो. याशिवाय इतरही अनेक समस्या निर्माण होतात.
पोलिसाचा मृत्यू :
१२ डिसेंबरला पश्चिम द्रूतगती मार्गावर नायलॉनच्या मांजामुळे समीर जाधव या पोलिस हवालदारचादेखील मृत्यू झाला होता. ते दिंडोशी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्य उरकून घरी परतत असताना मांजामुळे त्यांना जीव गमवावा लागला.
५७ जणांना ठोकल्या बेड्या :
यादरम्यान मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर झालेला दिसून आला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असल्यामुळे २५ डिसेंबरपासून नायलॉन मांजाच्या वापराविरोधात विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेत १४ जानेवारीपर्यंत मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ९२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ५७ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
एकाचा मृत्यू, तर एक जखमी :
१४ जानेवारी - मांजामुळे मोहम्मद शेख इजराईल फारुखी (२१) याचा मृत्यू, तर जालिंदर भगवान नेमाने (४१) गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
हे लक्षात घेत नायलॉनचा मांजा आणि काचेची कोटिंग असलेल्या मांजाची विक्री, साठा आणि वापर यावर १२ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
याप्रकरणी बोरिवली आणि विलेपार्ले पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे.
या कारवाईत एक लाख ४३ हजारांचा नायलॉन मांजाही जप्त हस्तगत करण्यात आला आहे.