Join us

खासगी रुग्णालयांकडून आता स्वतंत्र लस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत लसीच्या पुरवठ्याअभावी महापालिका आणि सरकारी केंद्रांवर लसीकरण खंडित झाले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत लसीच्या पुरवठ्याअभावी महापालिका आणि सरकारी केंद्रांवर लसीकरण खंडित झाले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला खासगी रुग्णालयांना लस खरेदीचे स्वतंत्र अधिकार असल्याने थेट केंद्राकडून लसींचे डोस खरेदी करण्यात येत आहे. परिणामी, सध्या महापालिका व सरकारी लसीकरणाला खीळ बसलेली असून, खासगी केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू आहे.

मुंबईत खासगी लसीकरण केंद्रांच्या तुलनेत महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत ३४ लाख २७ हजार ५६२ डोस वितरित करण्यात आले आहे, तर खासगी केंद्रावंर २७ लाख ५३ हजार ८९० लसींचे डोस वितरित करण्यात आले आहे.

लस उत्पादक कंपन्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या लसींपैकी ५० टक्के मात्रा केंद्र सरकारला द्याव्या लागतील, उरलेल्या ५० टक्क्यांतून राज्य सरकारे व खुल्या बाजारात लसींची खरेदी होईल. सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण मोफत राहील, त्यासाठी यापुढेही ‘कोविन’ पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. याबरोबरच केंद्र सरकारने आता खासगी रुग्णालयांना लस खरेदीसाठी मर्यादा निश्चित केली आहे. शासनाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, कोणतेही खासगी रुग्णालये आता मागील महिन्याच्या विशिष्ट आठवड्यात सरासरी लसीच्या वापरावरून जास्तीत जास्त दुप्पट साठा खरेदी करू शकेल. ही सरासरी मोजण्यासाठी रुग्णालये त्यांच्या निवडीनुसार आठवडा सांगू शकतात. लसीकरण मोहिमेचा भाग बनणार्‍या खासगी रुग्णालयांना तेथील बेडच्या संख्येवर लसीचा साठा दिला जाईल, अशीही मार्गदर्शक तत्त्वे शासनाने जारी केली आहेत.

एकीकडे सरकारी लसीकरण केंद्र बंद असताना खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस खरेदी करून ती नागरिकांना देण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालये नागरिकांकडून पैसे घेऊन लस देत आहेत. त्यासाठीचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. मोफत लसीसाठी लागणाऱ्या रांगा व वारंवार निर्माण होणारा तुटवडा यामुळे अनेक नागरिक पैसे मोजून लस घेत आहेत.

आतापर्यंत झालेले लसीकरण

विभाग पहिला डोसदुसरा डोस

आरोग्य कर्मचारी २०४८२० १४९९३२

फ्रंटलाइन कर्मचारी २४६६२४ १७५७९९

----------------

१८ ते ४४ २३९९६२१ ८९११४

४५हून अधिक २३५२३३५ ११७९९५८

----------

महापालिका केंद्रावर आतापर्यंत झालेले लसीकरण - ३४२७७५६२

खासगी केंद्रावर आतापर्यंत झालेले लसीकरण - २७५३८९०

राज्य शासनाच्या केंद्रावर आतापर्यंत झालेले लसीकरण - ३८५८७२

केंद्राकडून मिळणारा लसींचा साठा मर्यादित

देशस्तरावर राज्य लसीकरण मोहिमेत आघाडीवर आहे. मात्र केंद्राकडून लसींचा मिळणारा साठा हा मर्यादित आहे. यामुळे महापालिका व सरकारी लसीकरण मोहिमेत खंड पडत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाकडे महापालिका व राज्य शासन अशा दोन्ही पातळ्यांवर लसींच्या नियमित साठ्याकरिता विनंती करण्यात आली आहे. दुसरीकडे खासगी केंद्रांना लस खरेदीचे स्वतंत्र अधिकार असल्याने तेथील लसीकरण मोहीम सुरू आहे. लस वितरित करण्यात येत असताना प्राधान्यक्रम हा महापालिका व सरकारी केंद्रांना दिला जातो.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका प्रशासन