घर घेणे आता आणखी सोपे; प्रकल्पांना मिळणार क्यूआर कोड; सर्व माहिती एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:39 AM2023-03-28T09:39:01+5:302023-03-28T09:39:20+5:30
घर खरेदीदारास प्रकल्पाबाबत विविध माहिती हवी असते.
मुंबई : महारेराकडे यापुढे नव्याने नोंदणी करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासोबत क्यूआर कोड मिळणार आहे. या कोडमुळे घर खरेदीदारांना प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. भविष्यात सध्या नोंदणीकृत असलेल्या सर्व प्रकल्पांना टप्प्याटप्प्याने ही सुविधा लागू केली जाणार आहे.
घर खरेदीदारास प्रकल्पाबाबत विविध माहिती हवी असते. यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्प कधी नोंदवला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का, असा तपशील यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
- नुकतेच पुण्यातील एका विकासकाला क्यूआर कोडसह नवीन नोंदणीचे प्रमाणपत्र महारेराने जारी केले आहे.
- रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकाने कुठल्या कुठल्या बाबींची काळजी घ्यायची, याचा पुनरुच्चार प्रमाणपत्रात आहे.
- महारेरा देणार नवीन नोंदणीकृत प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासह क्यूआर कोड
- हा क्यूआर कोड स्कॅन करताच एका क्लिकवर उपलब्ध होणार प्रकल्पाची मूलभूत माहिती
- प्रकल्पाची मूलभूत माहिती मिळविणे झाले आता अधिक सोपे
- जुन्या नोंदणीकृत प्रकल्पांनाही टप्प्याटप्प्याने देणार क्यूआर कोड