Join us

नोंदणी नसलेल्या प्रकल्पांत घर घेताय? सावधान! महारेरा प्रकल्पांवर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 5:37 AM

५०० चौरस मीटरपेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प असल्यास त्याची नोंदणी आवश्यक आहे.

मुंबई : महारेराच्या नोंदणी क्रमांकाशिवाय गृह प्रकल्पांच्या काही जाहिराती प्रसिद्ध होत असून, या अनियमिततांची दखल घेत महारेराकडून या प्रकल्पांना नोटिसा पाठवत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नोंदणी क्रमांक असल्याशिवाय अशा जाहिराती करणे बेकायदेशीर असून अशा प्रकल्पांत घर खरेदीदारांनी गुंतवणूक करण्याचे टाळावे, असे आवाहन महारेराने केले आहे.

महारेराकडे नोंदणी करून नोंदणी क्रमांक असल्याशिवाय कुठल्याही बिल्डरला प्रकल्पाची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी, विक्री, खरेदी करता येत नाही. ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त किंवा ८ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प असल्यास त्याची नोंदणी आवश्यक आहे. प्रकल्प नोंदणीकृत आहे ना, महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे का, घर खरेदीकरार महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे ना, १० टक्क्यांपर्यंत  रक्कम देऊन घर खरेदी, घर नोंदणी करीत असल्यास बिल्डर घर विक्री  करार करतोय का, ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते दलाल नोंदणीकृत आहेत का, या सर्व बाबींची खात्री घर खरेदीदारांनी करावी, असे केल्यास फसवणुकीला आळा बसण्यास मदत होईल. 

प्रकल्प नोंदणीकृत असेल, तर काय फायदा?

बिल्डरकडे घर खरेदी, नोंदणीपोटी आलेली रक्कम इतरत्र खर्च न होता त्याच प्रकल्पावर खर्च व्हावी यासाठी बँकेत खाते उघडावे लागते. गुंतवणूकदारांकडून आलेल्या पैशांपैकी ७० टक्के रक्कम प्रकल्पाच्या कामासाठी खात्यात ठेवावी लागते. बिल्डरला हे पैसे केव्हाही काढता येत नाहीत. तीन महिन्याला प्रकल्पस्थितीची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी लागते. प्रकल्पात काय काम सुरु आहे, कसे काम सुरु आहे, काम कुठपर्यंत आले आहे हे खरेदीदारांना संकेतस्थळावर पाहता येते.