Join us

‘म्हाडा’मध्ये घर घेताय, दलालांपासून सावधान व्हा, ५,३११ सदनिकांसाठी अर्जविक्रीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 1:37 PM

MHADA: मंडळाने कोणालाही सल्लागार व प्रॉपर्टी एजंट, त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्ती नेमलेले नाहीत. अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही, याची नागरिकांनी दाखल घ्यावी.

मुंबई : म्हाडातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५,३११ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेच्या गो लाईव्ह कार्यक्रमाचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.

वांद्रे पूर्व येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमांतर्गत संजीव जयस्वाल म्हणाले की, शासनाच्या समाजातील शेवटच्या घटकाला परवडणाऱ्या दरातील घरे मिळवीत या उद्दिष्टपूर्ती प्रती म्हाडा कटिबद्ध आहे. येत्या वर्षभरात राज्यात जास्तीत जास्त गृहबांधनीचे प्रकल्प उभारणीचे नियोजन सुरू आहे.कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे म्हणाले, संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाइन व पारदर्शक असून यामध्ये मानवी हस्तक्षेपास कोणत्याही प्रकारे वाव नाही. सदनिकांच्या विक्रीकरिता कोणत्याही व्यक्तीच्या, मध्यस्थांच्या खोट्या प्रलोभनांना बळी पडू नका. तसेच मंडळाने कोणालाही सल्लागार व प्रॉपर्टी एजंट, त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्ती नेमलेले नाहीत. अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही, याची नागरिकांनी दाखल घ्यावी.नूतन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सोडत प्रक्रियेत सहभाग घेणे नागरिकांच्या दृष्टीने सुलभ व सोपे झाले आहे. कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाइन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरीत्या उपलब्ध होणार आहेत.

 अर्जदारांच्या सोयीकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनी चित्रफिती आणि हेल्प फाइल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे.

टॅग्स :म्हाडामुंबई