घर खरेदीस ब्रेक लागणार?
By admin | Published: January 5, 2015 01:45 AM2015-01-05T01:45:49+5:302015-01-05T01:45:49+5:30
मुंबईत घर घेणे आधीच बजेटच्या बाहेर गेले आहे. त्यात रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्यामुळे मुंबईकर घर खरेदीकडे पाठ फिरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : मुंबईत घर घेणे आधीच बजेटच्या बाहेर गेले आहे. त्यात रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्यामुळे मुंबईकर घर खरेदीकडे पाठ फिरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईतील रेडी रेकनरच्या दरात सरासरी १४.८१ वाढ झाल्याने घरांच्या किमतीही ४ ते ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे प्रवक्ते आनंद गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. रेडी रेकनरच्या दरवाढीमुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरण्यातही वाढ
होणार असल्याने दरवाढ निश्चित असल्याचे गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नव्या वर्षात राज्य शासनाने मुंबई महापालिका क्षेत्रातील रेडी रेकनरच्या दरात १४.८१ टक्के वाढ केली आहे. त्यात मुंबई शहरात १२.३० टक्के तर उपनगरांत सरासरी १५ टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यात आली आहे. दरवर्षी रेडी रेकनरच्या दरात वाढ निश्चित मानली जाते. शासनाने गतवेळच्या तुलनेत यंदा कमी वाढ केली आहे. तरीही घरांच्या वाढत्या किमतींमुळे घर खरेदी करणाऱ्यांची संख्या घटल्यास शासनाचा महसूल आणखी खालावण्याची भीती गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.
सध्या गृहखरेदीवर ५ टक्के मुद्रांक शुल्क आकारणी होते. शिवाय घराच्या किमतीच्या १ टक्के किंवा कमाल ३० हजार नोंदणी शुल्क भरावे लागते. त्यातून शासनाला मोठा महसूल मिळत आहे.
मात्र २०१४ सालातील गृहखरेदीतील निरुत्साह पाहता शासन यंदा दरवाढ करणार नाही, अशी अपेक्षा मुंबईतील बिल्डर्सला होती. दरम्यान रखडलेल्या प्रकल्पांंमुळे घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहखरेदीला ब्रेक लागला असून, महसुलात वाढ होण्याऐवजी दरवाढीमुळे घट होण्याची शक्यताही आहे.