Vidhan Parishad Election 2022: आमदार काय मच्छिबाजार वाटला का?; हितेंद्र ठाकूर यांची संजय राऊतांना चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 05:37 PM2022-06-20T17:37:36+5:302022-06-20T17:38:57+5:30
Vidhan Parishad Election 2022: तुम्ही सगळ्यांसमोर एकदा काय ते जाहीर करून टाका, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.
मुंबई: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2022) सुरू आहे. सायंकाळी ४ वाजता सर्वच्या सर्व आमदारांनी आपले मत टाकले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण दोन्ही बाजूंनी आपापले उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. यानंतर आता बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
मला फक्त काँग्रेसचे नेते विधानसभेत भेटले आणि घेऊन गेले नाहीत. तुमचे फुटेज बघा आधी भाजपचे नेते आधी आले आणि त्यानंतर काँग्रेस नेते आले. यानंत राष्ट्रवादी सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध आहेत. मी कोणावरही नाराज नाही, सगळे मला भेटले विनंती केली. लोकशाही मध्ये मतदानाचा अधिकार मी बजावला आहे, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले.
आमदार काय मच्छिबाजार वाटला का?
राज्यभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी आमदार फुटल्याबाबत तीव्र आरोप केले होते. याबाबत विचारले असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, या निवडणुकीचा निकाल लागला की कळेल, कोण फुटले आणि कोण नाही, असे सांगत जो निवडणुकीत हरतो, तो असे खापर दुसऱ्यांवर फोडत असतो. आमदार काय मच्छिबाजार वाटला का, अशी विचारणा केली. तर, तुमच्यात हिंमत असेल, तर सगळ्यांसमोर एकदा काय ते जाहीर करून टाका. संजय राऊत यांनी त्यांना अपेक्षित मते मिळाली नाही, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. माझ्यावर आरोप केले नव्हते, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
आणखी काय म्हणाले हितेंद्र ठाकूर?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आईचे दूध विकू नये, हे केलेले विधान योग्य आहे. कोणीही गद्दारी न केलेलीच बरी असते.
- मोठ्या पक्षांकडे मोठी व्होटबँक असते. मात्र, छोटे पक्ष आणि अपक्षांना परिश्रम करून आणि आपल्या कामाच्या जोरावर निवडून यावे लागते.
- मोठ्या पक्षांचे पाठबळ त्या त्या उमेदवाराच्या मागे असते. त्यांना काही प्रमाणात कमी मेहनत घ्यावी लागते. मात्र, आमच्यासारख्या छोट्या पक्षांनी १०० टक्के मेहनत घ्यावी लागते.
- दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये सर्वपक्षीय आमच्या विरोधातच निवडणूक लढवत असतात. आताही येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते आमचे विरोधक म्हणूनच लढणार आहेत.
- कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी क्षितीज ठाकूर परदेशात गेले होते. भेटायला आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच आमच्या कार्यकर्त्यांनी फारच आग्रह धरला. म्हणून ते आले. विमानतळावरून थेट विधिमंडळात आले आहेत. ते घरीही गेले नाहीत.