मुंबई : वारंवार तक्रार करूनही ग्राहकाला दोनदा सदोष (डॅमेज) मोबाइल दिल्याबद्दल मुंबई उपनगर ग्राहक तक्रार निवारण मंचाने ‘ॲमेझॉन’ला मोबाइलची मूळ किंमत व मानसिक त्रासाबद्दल १० हजार रुपये देण्याचे आदेश फेब्रुवारीमध्ये दिले. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार, त्याने गेल्या वर्षी ‘ॲमेझॉन’वरून एक मोबाइल मागवला. मात्र, हा मोबाइल सदोष होता. या मोबाइलमध्ये व्हायरस आपोआप डाउनलोड होत होता. याबाबत ‘ॲमेझॉन’कडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ‘टेक्निशियन’ला फोन तपासण्यासाठी पाठविले. त्यानेही कंपनीला ग्राहकाला फोन बदलून देण्यास सांगितले.
‘टेक्निशियन’च्या विनंतीनंतर ‘ॲमेझॉन’ने संबंधित ग्राहकाला फोन बदलून दिला. मात्र, दुसरा फोनही तसाच सदोष असल्याने पुन्हा ग्राहकाने ‘ॲमेझॉन’कडे तक्रार केली. फोन बदलून न मिळाल्याने त्याने पैसे परत करण्याची विनंती ‘ॲमेझॉन’ला केली. परंतु, वॉरंटी कार्ड नसल्याचे कारण देत ‘ॲमेझॉन’ने पैसे परत करण्यास नकार दिला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मोबाइल देतानाच त्यामध्ये वॉरंटी कार्ड नव्हते. त्यामुळे तक्रारदाराने ग्राहक मंचाकडे धाव घेतली.
एकतर्फी सुनावणी
१) ‘ॲमेझॉन’ला नोटीस बजावूनही त्यांनी वकिलामार्फत किंवा लेखी युक्तिवाद न मांडल्याने न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेतली. तक्रारदाराला २६,९९९ रुपये खर्च करूनही स्मार्टफोन वापरता आला नाही. दोन्ही स्मार्टफोन सदोष होते.
२) प्रतिवादी कंपनी (ॲमेझॉन) ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. ग्राहक आणि कंपनीमधील दुवा असलेल्या कंपनीमुळे संबंधित तक्रारदाराला मानसिक त्रास झाला. त्यामुळे प्रतिवादीने ग्राहकाला मोबाइलची मूळ किंमत २६,९९९ रुपये परत करावी.
३) त्याचबरोबर मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून एक हजार रुपये आदेशाची प्रत हाती आल्यानंतर ३० दिवसांत द्यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला.