सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा देणार : आ. अमीन पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:38 AM2024-12-04T10:38:43+5:302024-12-04T10:40:14+5:30
कामाठीपुरा पाचवी गल्ली येथे बेस्ट मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल सुरू करण्याबाबत स्वयंसेवी संस्थेसोबत चर्चा सुरू आहे.
मुंबई : सीबीएससी अभ्यासक्रमाच्या नवीन शाळा सुरू करून किमान १० हजार मुलामुलींना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच विभागात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विभागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मुंबादेवीचे काँग्रेस आ. अमीन पटेल यांनी मी 'लोकमत' कार्यालयातील सदिच्छा भेटीत सांगितले. यावेळी 'लोकमत'चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
कामाठीपुरा पाचवी गल्ली येथे बेस्ट मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल सुरू करण्याबाबत स्वयंसेवी संस्थेसोबत चर्चा सुरू आहे. कामाठीपुराचा पुनर्विकास करण्यासाठी येथील मालक, भाडेकरू यांची असोसिएशन तयार करण्यात आली आहे. नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची निवड केली. म्हाडाने सर्व कागदपत्रे तयार करून प्रत्येक कुटुंबाला ५०० फुटांपर्यंत घर देण्याची योजना आखली. पण, निविदा काढण्याच्या वेळेस हे काम पालिकेने मागून घेतले. त्यामुळे म्हाडा की पालिका या वादात पुढील प्रक्रिया रखडली आहे, असे आ. पटेल म्हणाले. अनेक जुन्या इमारतींचे प्रश्न रखडले आहेत. त्यावर काय करणार आहात?
मुंबईत सुमारे १६ हजार जुन्या इमारती आहेत. त्यातील ५ ते ६ हजार इमारती माझ्या मतदारसंघात आहेत. यातील अनेक दुकाने येथे असल्यामुळे भाडेकरू, रहिवासी इमारत सोडून जायला तयार होत नाहीत. अरुंद गल्ल्यांमुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे उमरखाडी येथील इमारतींचा क्लस्टर योजनेतून विकास करणार आहोत. डोंगरी, चिंचबंदर येथील बीआयटी चाळीच्या पुनर्वसनात रेल्वे अडसर ठरत आहे. त्यावरही मार्ग काढणार आहोत. फुटपाथवर जागोजागी असलेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण कसे हटविणार?
मोहम्मद अली रोड, मुसाफिर खाना,मनीष मार्केट, भेंडी बाजार, खेतवाडी हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. येथे फेरीवाले मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे फेरीवाला झोनसाठी एक नवी चांगली पॉलिसी आणावी लागेल. त्यांना बाहेर काढले तर ते जाणार कुठे? त्यांच्यासाठी काय करता येईल, याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करणार आहे. येथील इमारतींचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास झाला तर त्यांचा प्रश्न आपोआप सुटेल.
डोंगरी परिसरात बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांचे पूर्वी वास्तव्य
डोंगरीसारख्या भागात अनेक कलाकार पूर्वी राहत होते. लोकमान्य टिळक यांचेही काही काळ येथे वास्तव्य होते. सरदार गृह याच भागात आहे. युसूफ मेहरअली रोड यांचे स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान होते. त्यांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला नाही. त्यामुळे अशा सर्व ठिकाणांचे, त्यांच्या वस्तूंचे सरकारने जतन केले पाहिजे. त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक कॉफी टेबल बुक तयार करणार आहे.