Join us

डिसेंबरअखेर भुयारी मेट्रो धावणार! आंध्रप्रदेशातील कारखान्यात आठ डब्यांच्या मेट्रो तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 11:35 AM

आंध्रप्रदेशातील श्री सिटीमध्ये मेट्रोच्या कारखान्यात आठ डब्यांच्या मेट्रो तयार केल्या जात आहेत.

मुंबई- आंध्रप्रदेशातील श्री सिटीमध्ये मेट्रोच्या कारखान्यात आठ डब्यांच्या मेट्रो तयार केल्या जात आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर मेट्रोचे ८ कोच जोडण्याचे काम केले जाते आहे. कुलाबा - वांद्रे - सीप्झ या भुयारी मेट्रो ३ चे काम वेगाने सुरु असून, सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्पा वर्षाच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे कॉर्पोरेशनचे लक्ष्य आहे. कॉर्पोरेशनला हा टप्पा वेळेत गाठता आल्यास कोंडीचे विघ्न दूर होणार आहे.

  मुंबई महानगरात ३१४ किलोमीटर मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील.

            येत्या डिसेंबर-२०२३ अखेरपर्यंत मेट्रो ३ चा टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) पूर्ण होईल.

            दुसरा टप्पा जून-२०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल.

  सध्या सुमारे १ कोटी १० लाख नागरिक सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात.

 २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरात त्यामुळे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील.

 २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील.

ऐतिहासिक इमारती

दक्षिण मुंबईतल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंना हानी पोहोचणार नाही याची खबरदारी बाळगत काम फत्ते केले जात आहे. कफ परेड ते हुतात्मा चौक परिसरात मोठ्या संख्येने ऐतिहासिक इमारती असून, भुयारी मेट्रोचे काम करताना इमारतींना बाधा पोहोचणार नाही यावर लक्ष देण्यात आले आहे.

आरेमधील कार शेडचे कामही प्रगतिपथावर आहे. कार शेडमध्ये मेट्रोचे डबे दाखल होत असून, आतापर्यंत एकूण आठ मेट्रो दाखल झाल्या आहेत. एकूण नऊ मेट्रो शेडमध्ये दाखल होणार असून, नववी मेट्रो देखील काही दिवसांत येईल.