मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार; सप्टेंबरअखेरीस १५ इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:09 PM2022-08-18T12:09:41+5:302022-08-18T12:14:15+5:30
बेस्ट उपक्रमाने याबाबत सांगितले की, एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे गुरुवारी केवळ उद्घाटन करण्यात येणार आहेत.
मुंबई : मुंबईची शान असणा-या डबल डेकर बसचे वैभव जपण्यात बेस्ट प्रशासनाला यश येत असून, आता येत्या काही दिवसांत मुंबईकरांच्या सेवेत दहा ते पंधरा एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल होणार आहेत. तत्पूर्वी गुरुवारी या एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे अनावरण करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस दहा ते पंधरा एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
बेस्ट उपक्रमाने याबाबत सांगितले की, एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे गुरुवारी केवळ उद्घाटन करण्यात येणार आहेत. सप्टेंबरच्या अखेरिस एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यांवर धावतील. सुरुवातीला दहा ते पंधरा बस रस्त्यांवर धावतील. त्यानंतर डिसेंबर महिन्यांत उर्वरित २०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. तर पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण ९०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
कुठे होणार कार्यक्रम
१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता नरिमन पॉइंट येथील टाटा थिएटरमध्ये बेस्टच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या नव्या कंत्राटी दुमजली बसगाड्या अशोक लेलँडच्या बनावटीच्या असून यांचे मालकी हक्क चलो आणि स्विच मोबिलीटी यांच्याकडे आहेत. सुरुवातीला ऑनलाईन तिकीट अॅपची सुविधा पुरवणारा चलो अॅप आता थेट कंत्राटदार म्हणून बेस्टला बस पुरवू पाहतोय. हे सारे अनाकलनीय आहे. बऱ्याच वर्षांनी बेस्टच्या ताफ्यात अशोक लेलँडचे पुनरागमन झाल्याचा आनंद तर आहेच पण या बससुद्धा भाडेतत्वावर घेतल्यामुळे पुन्हा एकदा स्व-मालकीच्या बसगाड्या बेस्ट नक्की घेणार का ? हा प्रश्न मुंबईकर प्रवाशांच्या मनात कायम आहे.