मुंबई : कारागृहातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण येत असताना भायखळा येथील महिला कारागृहात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना दिसत आहे. गेल्या १० दिवसांत ६ मुलांसह ३९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यापैकी ३६ जणांना जवळच असणाऱ्या एका शाळेत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. तर वरिष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व कैद्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे. त्यांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अन्य कारागृहातही क़ैदयांच्या तपासणीवर भर देत योग्य ती ख़बरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचे संक्रमण नेमके कसे झाले याबाबात कारागृह प्रशासन अधिक तपास करत आहेत. भायखळा महिला कारागृहात २६२ क़ैदयांची क्षमता असताना ३६३ महिला कैदी आहे. त्यामुळे यावर वेळीच रोख आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर राज्यभरातील कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यात एप्रिलपर्यंत ९ कैदी आणि ८ कारागृह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण ४३ कारागृह असून त्यात ९ मध्यवर्ती कारागृह, एक महिला ,तर २८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे.
राज्यभरात १ हजार ६८५ कैदी आणि ३ हजार १४० कारागृह कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते.