- नितीन जगताप
पावसाळ्यात अनेकवेळा रेल्वेचा खोळंबा होतो. पॉइंट फेल्युअर झाल्यामुळे रेल्वे सेवेला याचा मोठा फटका बसतो. लोकल, मेल एक्स्प्रेस रद्द होतात, काही गाड्यांना लेटमार्क लागतो. प्रवाशांची गैरसोय होते. मध्य रेल्वेने भायखळा विभागातील अतिवृष्टीदरम्यान पॉइंट फेल्युअरचा प्रभाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. महत्त्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधांची सुरक्षा, सुरळीत ट्रेनचे कामकाज आणि चांगला रेल्वे प्रवास होण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण बदलांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या सुधारणांचा वापर मध्य रेल्वेच्या इतर पूरप्रवण ठिकाणी केला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेला भायखळा येथे पूरप्रवण भाग हा केंद्रबिंदू आहे. या पॉइंट्सला सुधारित पॉइंट मशीन कव्हर्ससह बसवलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये पाणी जाण्यापासून रोखता येते. पावसाळ्यात या नावीन्यपूर्ण कव्हर्सने पॉइंट मशिन्सचे यशस्वीरित्या संरक्षण केले आहे, पॉईंटमधील बिघाड मोठ्या प्रमाणात कमी केला असून रेल्वेसेवा सुरळीत चालण्यास मदत होत आहे.नावीन्यपूर्ण सुधारणांसह एकूण २५ पॉइंट मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे पावसाळ्याशी संबंधित पॉइंट अपयश कमी करण्यात आशादायक परिणाम दिसून येत आहेत.
पॉइंट संरक्षणात्मक उपाय
- भायखळा येथील सिग्नल आणि दूरसंचार दुरुस्ती केंद्राने पुराच्या वेळी पॉइंट बिघाड दूर करण्यासाठी एक मोहीम सुरू केली. - गेल्या सहा महिन्यांत पॉइंट मशीनला वॉटरप्रूफ करण्यासाठी योग्य प्रयत्न केले गेले आहेत. - ज्यामुळे पावसात उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहेत. पॉइंट मशिन्सना पाण्याच्या प्रवेशापासून संरक्षण करण्यासाठी, शॉर्टसर्किटला प्रवण असलेल्या संवेदनशील भागांची ओळख करून संरक्षणात्मक उपाय लागू केले आहेत.