सुधा भारद्वाज यांच्या प्रकृतीकडे भायखळा तुरुंग प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:04 AM2021-05-02T04:04:06+5:302021-05-02T04:04:06+5:30
माकप आमदाराचा आरोप; योग्य उपचारासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भीमा कोरेगावप्रकरणी तुरुंगात असलेल्या ज्येष्ठ ...
माकप आमदाराचा आरोप; योग्य उपचारासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भीमा कोरेगावप्रकरणी तुरुंगात असलेल्या ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या ॲड.सुधा भारद्वाज यांच्या औषधोपचारककडे भायखळा महिला कारागृह प्रशासनकडून दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी केली.
भारद्वाज यांना तातडीने योग्य वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन करून केली आहे.
भारद्वाज या गेल्या अडीच वर्षांपासून भायखळ्यातील महिला कारागृहात आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांना काही व्याधी असून, अतिसार, थकवा आणि तोंडाची गेलेली चव ही लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांनी जे.जे. रुग्णालयात तपासणी आणि उपचारासाठी अर्ज केला, परंतु प्रशासनाने काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यांची प्रकृती गंभीर होत असून, त्यांना तातडीने योग्य ते औषधोपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत. सरकारने त्वरित लक्ष घालून प्रशासला त्यांना सुसज्ज रुग्णालयात हलवून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सूचना कराव्यात, अशी मागणी निकोले यांनी केली.
भीमा कोरेगाव प्रकरणातील खरे आरोपी मोकाटपणे फिरत आहेत. त्यांना पोलीस पकडत नाहीत, एनआयए केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चौकशी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
.........................