भायखळा स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाचे होणार जतन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:59 AM2019-02-07T03:59:21+5:302019-02-07T03:59:32+5:30
भायखळा स्थानकाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त आहे. भायखळा स्थानक हेरिटेज ग्रेड वन मध्ये येते. असे असून देखील याकडे त्यादृष्टीने पाहिले जात नाही.
मुंबई : भायखळा स्थानकाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त आहे. भायखळा स्थानक हेरिटेज ग्रेड वन मध्ये येते. असे असून देखील याकडे त्यादृष्टीने पाहिले जात नाही. त्यामुळे काही सामाजिक संस्था आणि हेरिटेज संस्था एकत्र येऊन भायखळा स्थानकाला त्याचे जुने ऐतिहासिक रूप परत देणार आहेत़
या कामाला एक ते दीड महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम एका वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या कामासाठी साधारण ३.५ कोटीचा खर्च करण्यात येणार आहे. एका वर्षात हे स्थानक आकर्षक होईल, अशी आशा आर्किटेक्टर आभा लांबा यांनी व्यक्त केली आहे. प्रवाशांना मुंबईतील हेरिटेज बाबीबद्दल माहिती मिळणे आवश्यक आहे. भायखळा स्थानक हे त्यांपैकी एक आहे. या स्थानकाला त्याचे जुने ऐतिहासिक रूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध कामे करून भायखळा स्थानकाला त्याचे जिवंत रूप दिले जाणार आहे, असे भाजपा प्रवक्त्या शायना एन सी यांनी सांगितले. मुंबई हेरिटेज कमिटी, आय लव्ह यू मुंबई, बजाज फाऊंडेशन, आभा लांबा असोसिएशन यांच्या सहकार्याने काम सुरू करण्यात येणार आहे.
भायखळा स्थानक हे व्यस्त स्थानकांपैकी एक स्थानक आहे. मुंबई-ठाणे लोकल १८५३ साली चालविण्यात आली. तेव्हा सुरूवातीचे स्थानक भायखाळा होते़ त्यावेळी २०० कामगारांनी रेल्वेचे इंजिन या स्थानकावरआणले होते़ सुरूवातीला हे स्थानक लाकडी संरचनेत बांधण्यात आले होते. त्यानंतर १८५७ पुन्हा नव्याने बांधण्यात आले. देशातील सर्वात जुन्या स्थानकापैकी भायखळा स्थानकाचा क्रमांक लागतो. वर्तमान स्वरूपात असलेले हे रूप १८५७ सालचे आहे.
हे काम केले जाईल
छताचे काम केले जाणार आहे, दरवाजे, खिडक्या दुरुस्त केल्या जातील़
बाहेरील अतिरिक्त बांधकाम हटविले जाईल, रंगकाम केले जाईल, विद्युत तारा, टेलिफोन तारा सुस्थितीत करण्यात येतील, तिकिट घर, आरपीएफ कार्यालय सुस्थितीत केले जाईल