Join us

हत्तीरोगाला टाटा बाय बाय? दहा जिल्ह्यांमध्ये निर्मूलन कार्यक्रम

By स्नेहा मोरे | Published: February 10, 2023 11:31 AM

हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कंबर कसली असून त्यासाठी दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. राज्यात एकूण १८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा प्रभाव आहे.

मुंबई : कोरोना महासाथीच्या काळात अनेक साथीचे आजार तसे दुर्लक्षित राहिले. त्यातलाच एक म्हणजे हत्तीरोग. हा एक दीर्घकालीन आजार असून तो विशिष्ट प्रकारच्या डासांपासून पसरतो. हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी राज्य सरकारच्याआरोग्य विभागाने कंबर कसली असून त्यासाठी दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. राज्यात एकूण १८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा प्रभाव आहे.

असा होतो रोगाचा प्रसार-  क्युलेक्स प्रकारचे डास बुचेरेरिया बॅनक्रॉप्टीया हत्तीरोगाच्या परोपजीवी जंतूंचा प्रसार करतात.-  दूषित डास मनुष्याला चावतात त्या ठिकाणी हत्तीरोगाचे जंतू सोडतो.-  हा जंतू त्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश मिळवितो आणि लसीका संस्थेमध्ये जातो.

औषधाेपचार मोहीम-   यवतमाळ, ठाणे, पालघर, नंदुरबार, नांदेड, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली अशा दहा जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.-  भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या चार जिल्ह्यांत सार्वत्रिक औषधाेपचार मोहीमही राबविण्यात येणार आहे.

संसर्गाचा काळ महत्त्वाचा...हत्तीरोगाच्या जंतूंचा शरीरातील प्रवेश आणि मायक्रोफायलेरिया रक्तात सापडणे या कालावधीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. हत्तीरोगाच्या संसर्गक्षम जंतूंचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा आठ ते १६ महिन्यांचा असतो.

-  राज्यात हत्तीरोगाचे २३ हजार ८२३ रुग्ण आहेत.-  सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यांत असून त्यांची संख्या १० हजार ३८० एवढी आहे.वय, वजनानुसार औषधे-  आरोग्य विभागाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत प्रत्यक्ष देखरेखीखाली डायइथीलकार्बामेझीन व अलबेंडाझोलही औषधे दिली जातात.   -  औषधांची मात्रा वय आणि वजनानुसार दिली जातात. ज्या रुग्णांमध्ये मायक्रो फायलेरिया आढळून येतात. अशा रुग्णांना डीईसी (डायइथील कारबामाझाइन) या गोळ्या सहा मिलिग्रॅम प्रतिकिलो शरीराचे वजन (प्रौढ व्यक्ती ३०० मिलीग्रॅम) या प्रमाणात १२ दिवस देण्यात येतात.-  रुग्णाने पायाची स्वच्छता करणे आणि काळजी घेणे तसेच व्यायाम करणे हे महत्त्वाचे असते.  -   हत्तीरोगाची तीव्र लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक असते.

या जिल्ह्यांत प्रमाण घटले : जळगाव, वर्धा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या आठ जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक औषधाेपचार मोहीम व नियमित सर्वेक्षण यामुळे हत्तीरोगाचे प्रमाण कमी झाले.

टॅग्स :आरोग्यराज्य सरकार