मुंबापुरीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पद्मिनी’ टॅक्सीने कधीकाळी शहरावर अधिराज्य गाजवले होते. नव्वदच्या दशकात मुंबईत तब्बल ६५ हजार ‘प्रीमिअर पद्मिनी’ टॅक्सी धावत होत्या. काळी-पिवळी म्हटले तरी ‘पद्मिनी’ डोळ्यासमोर यायची आणि आजही येते. परंतु आज तिचा भाव घसरला आहे. तिचा आता अखेरचा प्रवास सुरु झाला असून, सद्या मुंबईत केवळ ३०० पद्मिनी शिल्लक आहेत. मुंबईच्या अर्थकारणाला हातभार लावणारी ही गाडी आता नामशेष होत असली तरीदेखील तिने तिचा ‘रुबाब’ जपला होता. याच गाडीमध्ये चालकांनी आपले अर्धेधिक आयुष्य व्यतीत केले. दरम्यान, या टॅक्सी भंगारात काढण्याचा निर्णय रस्ते आणि वाहतूक विभागातर्फे २०१३ साली घेण्यात आला आहे. २० वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या या टॅक्सीना नवा परवाना देण्यात आलेला नाही. परिणामी ज्या टॅक्सींच्या परवान्याची मुदत संपलेली नाही; अशा पद्मिनी रस्त्यांवर धावत असून, काळाच्या ओघात याही नष्ट होणार आहेत. भविष्यात ही गाडी केवळ फोटोपुरती मर्यादित राहणार असून, नव्या पिढीला याचा गंधही नसणार; म्हणूनच तिचा रुबाब ‘लोकमत’चे छायाचित्रकार सुशील कदम यांनी टिपला आहे.
बाय बाय ‘पद्मिनी’
By admin | Published: June 27, 2017 3:38 AM