मुंबई: वांद्रे वरळी सि-लिंक परिसरात हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याचा डाव उधळण्यात आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून टोळीचे अजून दोन सराईत आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
अटक आरोपींची नावे अब्दुल्ला सय्यद पठाण उर्फ सन्नाटा (२७) , मोहम्मद इमरान मन्सुरी उर्फ मम्हा (२५), मगदूम मंसूरी (२५) आणि मोहम्मद अली शेख (२७) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून darel उर्फ ख्रिश्चन पापा उर्फ माहिमचा पापा , रिक्षा चोर वॉल्टीचा पापा व इस्माईल उर्फ चना (२६) हे दोघे फरार आहेत. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप आणि गुन्हे प्रकटीकरण पथक हे वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात गस्त करत असताना जगताप यांना माहिती मिळाली की टोल नाक्यावर काही इसम दरोडा टाकण्याकरिता एकत्र जमणार आहेत. त्यानुसार त्यांनी तातडीने पथकासह रिक्लेमेशनच्या यू ब्रिज खाली असलेल्या नर्गिस दत्त नगर झोपडपट्टी लाल मिट्टी झोपडपट्टी परिसरात सापळा रचला रात्री १२:४५ च्या सुमारास चार ते पाच इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांचे बोलणे संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ही कार्यवाही करताना त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला मात्र चौघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. तेव्हा त्यांच्याकडे कोयता, लांब सुरा कटावणी आणि दरोडा साठी लागणारी लोखंडी हत्यारे सापडली. त्यांच्या चौकशीमध्ये टोल नाक्यावर दरोडा घालण्यासाठी ते आले असल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चार आरोपींच्या विरोधात शस्त्र अधिनियम,१९५९ चे कलम २५,४, भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३९९, ४०२ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५, ३७(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
कॅश केबिन मे गेम बजाना है!
वांद्रे पोलिसांनी सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी आलेले संशयीत इसम हे आज इधर सिलिंग के टोल नाके पर कॅश कॅबिन मे घुसके गेम बजाना है अशी चर्चा करत होते. त्यावरून पथकाचा संशय बळावला आणि पुढील कारवाई करण्यात आली.