Join us  

सी-वर्ल्ड प्रकल्प ३५० एकर जागेतच होणार

By admin | Published: December 01, 2015 10:30 PM

मुंबईत बैठक : प्रकल्पाबाबत हालचाली गतिमान

मालवण : सी-वर्ल्ड प्रकल्पावरून सिंधुदुर्गात पुन्हा एकदा वातावरण तापले असताना शासनस्तरावर सी-वर्ल्ड साकारण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ३५० एकर जागेतील प्रकल्पाचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश पुणे येथील सायन्स टेक्नोलॉजी या संस्थेला देण्यात आले आहेत. जुन्या आराखड्यानुसार १३९० एकर जागेतील प्रकल्प अहवाल ३५० एकर जागेत बसवताना या अहवालात पूर्वीच्या अहवालातील हॉटेल व अन्य सुविधा वगळून केवळ थीम पार्कची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी मालवणात जाहीर केल्याप्रमाणे ओशियानिक वर्ल्डची उभारणी करण्यात येणार आहे. ‘सी-वर्ल्ड’बाबत मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे मुख्य सचिव वलसा नायर, पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या पुणे सायन्स टेक्नोलॉजी या संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.३५० एकरांमध्ये हा प्रकल्प साकारला जावा, याबाबत संस्थेने प्रकल्प अहवाल लवकरात लवकर शासन दरबारी सादर करावा, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती साहसी जलक्रीडा वरिष्ठ व्यवस्थापक सुबोध किनळेकर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)‘सी-वर्ल्ड’ वायंगणी-तोंडवळीत साकारणार ?काही दिवसांपूर्वी प्रकल्प अहवाल प्रमुख पदाचा राजीनामा डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिला होता. अशा स्थितीत कमी जागेतील या प्रकल्पाच्या कामास संथ गती प्राप्त झाली होती. प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध असेल तर प्रकल्प अन्यत्र हलवू, असाही चर्चेचा सूर होता. यात पालकमंत्री दीपक केसरकर व भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी कमी जागेतील ‘सी-वर्ल्ड’ वायंगणी - तोंडवळी येथेच साकारला जाईल व प्रकल्पाचा आराखडा लवकर सादर होईल. जागामालकांची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक पार पडली, असे सांगितले होते. त्यामुळे ‘सी-वर्ल्ड’ वायंगणी - तोंडवळी येथेच साकारला जाण्याची दाट शक्यता आहे.