सीए, एम.कॉमचा पेपर एकाच दिवशी
By admin | Published: April 1, 2017 04:12 AM2017-04-01T04:12:57+5:302017-04-01T04:12:57+5:30
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होण्याआधीच गोंधळ सुरू झाल्याने पुन्हा एकदा विद्यार्थी तणावाखाली आले
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होण्याआधीच गोंधळ सुरू झाल्याने पुन्हा एकदा विद्यार्थी तणावाखाली आले आहेत. १७ मे रोजी सीए आणि एम.कॉमचा पेपर एकाच दिवशी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठात या दिवशी होणारा पेपर पुढे ढकलण्यात यावा यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून नुकतेच एम.कॉम पार्ट टूचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे एम.कॉमचा रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर १७ मे रोजी ठेवला आहे. तर दुसरीकडे चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडियातर्फे घेण्यात येणाऱ्या सीएच्या परीक्षेचाही इनडायरेक्ट टॅक्सचा पेपर आहे. असे दोन पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. विद्यापीठाने या दिवशीचा पेपर पुढे ढकलावा, या मागणीने जोर धरला आहे. मनविसेनेही विद्यापीठाकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने हा पेपर पुढे ढकलावा, अशी मागणी माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाशी संपर्क साधला आहे. त्या दिवशीचा पेपर पुढे ढकलण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती तांबोळी यांच्याकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)